आमदारकी, खासदारकी गेली तरी पर्वा नाही पण कर्जमाफी घेणारच: अशोक चव्हाण

By admin | Published: April 17, 2017 07:32 PM2017-04-17T19:32:51+5:302017-04-17T21:36:12+5:30

आम्हा सर्वांची आमदारकी खासदारकी गेली तरी पर्वा नाही पण संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही.

MLAs, MPs do not care though, but they will get relief: Ashok Chavan | आमदारकी, खासदारकी गेली तरी पर्वा नाही पण कर्जमाफी घेणारच: अशोक चव्हाण

आमदारकी, खासदारकी गेली तरी पर्वा नाही पण कर्जमाफी घेणारच: अशोक चव्हाण

Next
>ऑनलाइन लोकमत
(नामपूर/सटाणा) नाशिक दि.17 - आम्हा सर्वांची आमदारकी खासदारकी गेली तरी पर्वा नाही पण संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शेतक-यांना केलं आहे.
 
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी  विरोधी पक्षांची संयुक्त संघर्ष यात्रा आज नाशिक जिल्ह्यात पोहोचली. नामपूर बाजार समिती मैदानावर विराट सभेला संबोधित करताना चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत मात्र सरकारची संवेदनशीलता संपली आहे. आई वडिलांकडे लग्नासाठी पैसे नसल्याने उपवर मुली आत्महत्या करू लागल्या आहेत. कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नसल्याने राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे पण सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारला उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाचा अभ्यास करावा लागतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुरु झालेला हा संघर्ष कर्जमाफी मिळेपर्यंत थांबणार नसून सरकारला संपूर्ण कर्जमाफी द्यावीच लागेल असे चव्हाण म्हणाले.
 
याच सभेत बोलताना विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, खासदारांच्या विमान प्रवासासाठी मंत्र्यांची कॉलर पकडणारे शिवसेना नेते कर्जमाफीच्या मुद्द्यावर का गप्प आहेत? ही लढाई शेतक-यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय थांबणार नाही. आगामी काळात रस्त्यावर उतरून सरकार विरोधातील लढा आणखी तीव्र करू असा इशारा विखे पाटील यांनी सरकारला दिला.
 
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजप सरकाच्या कामावर कुठलाही वर्ग समाधानी नाही. शेतकरी मेटाकुटीला आला असून कांदा, कापूस,  सोयबीन,  द्राक्षे कुठल्याही शेतमालाला भाव नाही. शेतक-यांच्या संस्थांवर बगलबच्चे बसवून संस्था गिळंकृत करण्याचा भाजपचा डाव असून यांना वेळीच रोखण्याची गरज असून त्यासाठी कर्जमाफी होईपर्यंत मंत्र्यांना गावबंदी करा असे आवाहन पवार यांनी उपस्थित शेतक-यांना केले.
 
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु आझमी शेकाप नेते प्रवीण गायकवाड यांनीही सरकारवर सडकून टीका करत कर्जमाफी मिळेपर्यंत हा लढा सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले.
 
तत्पूर्वी नाशिकच्या मालेगाव येथे संघर्ष यात्रेचे स्वागत व जाहीर सभा झाली. त्यांनंतर प्रमुख नेत्यांनी मालेगाव तालुक्यातील वाके येथील आत्महत्या केलेल्या २५ वर्षीय तरुण शेतकरी मनोज सावंत याच्या कुटुंबियांची  भेट घेऊन सांत्वन केले. त्याने  नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती.
 
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण,  महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील,  राजेश टोपे, शशिकांत शिंदे, आ. भाई जगताप, आ.पंकज भुजबळ, आ. गोपालदास अग्रवाल, आ. डी. पी. सावंत, आ. अमर राजूरकर, आ. वसंत चव्हाण, आ. सुधीर तांबे, आ. प्रदीप नाईक, आ. चंद्रकांत रघुवंशी आ.दिपिका चव्हाण, आ. विद्या चव्हाण, आ. यशोमती ठाकूर, पीपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी, शेकापचे प्रविण गायकवाड, संघर्ष यात्रेचे समन्वयक आ. जितेंद्र आव्हाड आणि आ. सुनिल केदार यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
 
संघर्ष  यात्रेने बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याचा प्रवास केला सर्व ठिकाणी शेतक-यांनी मोठ्या उत्साहात संघर्ष यात्रेचे स्वागत केले. उद्या शहापूर येथे संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याचा समारोप होणार आहे.                        

Web Title: MLAs, MPs do not care though, but they will get relief: Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.