शिंदे गटाचे आमदार बाळासाहेब भवनात येणार; 'वर्षा'वरून आदेश आले, निकाल किती वाजता?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:24 PM2024-01-10T12:24:41+5:302024-01-10T12:35:20+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच महाराष्ट्रातील सरकारवर कोणतेही संकट नसल्याचे म्हटले होते.
राज्याच्या राजकारणासाठी आजचा मोठा दिवस ठरणार आहे. काही तासांत गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय खेळाचा निकाल येणार आहे. एकनाथ शिंदे गट की उद्धव ठाकरे गट अपात्र ठरतो त्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. अशातच शिंदे गट अपात्र ठरल्यास पुढे काय? असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. अशातच शिंदे गटाच्या आमदारांना आज दुपारी ३ वाजता बाळासाहेब भवनामध्ये एकत्र येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच महाराष्ट्रातील सरकारवर कोणतेही संकट नसल्याचे म्हटले होते. अध्यक्षांनी कोणताही निर्णय दिला तरी आमचे सरकार स्थिर राहिल. आमची युती कायदेशीर वैध आहे. अध्यक्षांचा निर्णय आमच्याबाजुने येईल अशी अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले होते. शिंदेनींही आपणच मुख्यमंत्री राहणार असल्याचे म्हटले होते. तर ठाकरे गट मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप करत आहे.
अशातच दुपारी ४ वाजता आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निकाल येणार आहे. यामध्ये जे काही होईल ते आपल्याला मान्य असेल असे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांना दुपारी ३ वाजता बाळासाहेब भवनामध्ये एकत्र येण्याचे आदेश देण्यात आल्याचे केसरकर म्हणाले.
जर ठाकरे गटाविरोधात निकाल आला तर त्यांच्या गटातील आमदारांना शिंदे गटाचा व्हीप लागू होणार असून त्यांना पळत वर्षा बंगल्यावरील बैठकीला यावे लागले असे संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे.