आमदारांनी नाट्यस्पर्धा घ्यावी

By Admin | Published: February 22, 2016 02:36 AM2016-02-22T02:36:09+5:302016-02-22T02:36:09+5:30

राज्यातील प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारक्षेत्रात नाट्यस्पर्धा घ्यावी, त्यातून निवडलेल्या नाटकांमधून सर्वोत्कृष्ट नाटके निवडली जावीत, अशी अपेक्षा

MLAs should take the theater competition | आमदारांनी नाट्यस्पर्धा घ्यावी

आमदारांनी नाट्यस्पर्धा घ्यावी

googlenewsNext

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगरी (ठाणे) : राज्यातील प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारक्षेत्रात नाट्यस्पर्धा घ्यावी, त्यातून निवडलेल्या नाटकांमधून सर्वोत्कृष्ट नाटके निवडली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त करून नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी राज्यव्यापी नाट्यचळवळीचा एक उपक्रम सुचवला. ही सूचना अवलंबली तर आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री करंडकासारखी एक अभिनव स्पर्धा आकार घेण्याची शक्यता आहे.
नाट्यसंमेलनाचे समारोपीय अध्यक्षीय भाषण करताना गवाणकर यांनी आयोजकांनी, रसिकांनी हे संमेलन यशस्वी केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या समारोप सोहळ्याला उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, दीपक करंजीकर, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, मंदा म्हात्रे, संजय केळकर, सुभाष भोईर, पोलीस आयुक्त परमवीर सिंग, जिल्हाधिकरी अश्विनी जोशी, ठाण्याचे महापौर संजय मोरे, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

नाट्य परिषदेला सोशल क्रेडिट द्यावे - दीपक करंजीकर
सरकारने २०११मध्ये परिषदेला ५ कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. त्यापैकी साडेतीन कोटी रुपये हे परिषदेच्या खर्चासाठी होते. उर्वरित दीड कोटी रुपयांपैकी ७५ लाख रुपये परिषदेच्या संगणकीकरणासाठी खर्च केले आहेत. त्याचे बिल सरकारकडून अद्याप आलेले नाही. ७५ लाखांतून नाट्य परिषद ग्रंथसंग्रहालय उभे करणार आहे. त्याचे काम हाती घेतले आहे. हा निधी सरकारकडून मिळावा. तालुकापातळीवर नाट्यगृहे उभारावीत. उभारण्यात येणारी नाट्यगृहे ही परवडणारी असावीत. नाट्यअकादमी सुरू करण्यासाठी परिषदेचा पुढाकार आहे. कॉर्पोरेट कंपन्यांना कार्बन क्रेडिट दिले जाते. त्याच धर्तीवर सरकारने परिषदेला सोशल क्रेडिट द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मासुंदा तलावात अ‍ॅम्फी थिएटर द्या : विचारे
ठाण्यात झालेल्या संमेलनात पहिल्यांदाच सकाळी ६ वाजता नाट्यसंगीताच्या मैफली झाल्या. त्याला रसिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या प्रतिसादाची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने मासुंदा तलावात अ‍ॅम्फी थिएटर आम्हाला तयार करून द्यावे. नाट्यसंमेलनाचे थेट प्रक्षेपण यापूर्वी करत होते. यापुढे होणाऱ्या सर्व संमेलनांचे नि:शुल्क थेट प्रक्षेपण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी बोलावे, अशी विनंती संमेलनाचे आयोजक खा. राजन विचारे यांनी केली.

मल्टिप्लेक्सच्या धर्तीवर
नाट्यगृह उभारावे : एकनाथ शिंदे
स्वागताध्यक्ष म्हणून सर्वांचे स्वागत करण्याची संधी दिली, हा बहुमान समजतो. न भुतो.. अशी दिंडी निघाली. संमेलनाध्यक्षांनी त्यासाठी दिलेली पावती आयोजनाचे फलित आहे. नाट्यकला जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी आपापले हात पुढे केले पाहिजेत. मल्टिप्लेक्सच्या धर्तीवर नाट्यगृह शासनाने उभारावे. नाट्य व चित्रपटसृष्टीचे प्रशिक्षण देणारी अ‍ॅकॅडमी ठाण्यात सुरू करावी. बॅकस्टेज आर्टिस्टसाठी सकारात्मक योजना, त्यांना पेन्शन देण्याची योजना असावी. ठाणे जिल्ह्यात अनेक उद्योग यावेत, लवकरात लवकर मेट्रो यावी, अशी मागणी संमेलनाचे स्वागताध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

उत्तम नाट्यरसिकांच्या गावाला
पुरस्कार द्या : खा. संजय राऊत
मराठी नाट्यपरंपरेला मरण नाही. मराठी संगीतभूमी ही वाईट काळात जिवंत ठेवण्याचे काम विदर्भातील नाट्यकलाकारांनी केले आहे. महाराष्ट्र एक ठेवण्याचे काम नाट्यचळवळीच्या रंगमंचाने केले आहे. मराठी नाट्यसृष्टीवर संकट आले तेव्हा मदतीचा हात बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. रंगभूमी ही रसिकांच्या प्रेमावर उभी आहे. त्यामुळे नाट्य परिषदेने ज्या शहरात उत्तम नाट्यरसिक आहेत, त्या शहरालाही पुरस्कार द्यावा, अशी सूचना सेनेचे खा. संजय राऊत यांनी व्यक्त केली.

बॅकस्टेज आर्र्टिस्टच्या घरांसाठी जागा द्या : नाट्य परिषदेसाठी आरक्षित भूखंड सीआरझेडमध्ये गेला. नव्या विकास आराखड्यानुसार पाच एकरचा भूखंड आरक्षित करून ठेवल्यास त्या ठिकाणी बॅकस्टेज आर्टिस्टसाठी घरे बांधून देता येतील, असे मत नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केले.

सीएसआरमधून नाट्य परिषदेस सहकार्य
नाट्य परिषदेने माझ्याकडे कोणतीही मागणी केलेली नसली तरी मी ज्या खात्याचा मंत्री आहे, त्या सार्वजनिक उपक्रम खात्यात दरवर्षी २ लाख कोटी रुपये सरप्लस आहे. सीएसआरमधून नाट्य परिषदेस सहकार्य करणार.
- अनंत गीते, केंद्रीय मंत्री

Web Title: MLAs should take the theater competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.