आमदार पुत्राच्या मारहाणीपासूनच बेबनाव

By admin | Published: January 15, 2015 12:57 AM2015-01-15T00:57:13+5:302015-01-15T00:57:13+5:30

धरमपेठ येथील खूनप्रकरणी मृत रितेश बैसवारे आणि आरोपी हे एकेकाळी चांगले मित्र होते. परंतु एका आमदार पुत्राला मारहाण केल्यापासून दोघांमध्ये बेबनाव झाला होता. या वादानंतर मृत रितेश हा

MLA's son's assassination | आमदार पुत्राच्या मारहाणीपासूनच बेबनाव

आमदार पुत्राच्या मारहाणीपासूनच बेबनाव

Next

रितेश बैसवारे खूनप्रकरण : आरोपींना २३ पर्यंत कोठडी
नागपूर : धरमपेठ येथील खूनप्रकरणी मृत रितेश बैसवारे आणि आरोपी हे एकेकाळी चांगले मित्र होते. परंतु एका आमदार पुत्राला मारहाण केल्यापासून दोघांमध्ये बेबनाव झाला होता. या वादानंतर मृत रितेश हा वारंवार अपमान करीत असल्याने आरोपी संतापले असून यातूनच त्याचा खून करण्यात आला आहे. आरोपींनी तशी कबुली दिली आहे. याप्रकरणी आरोपी अश्विन तुर्केल आणि निखिल डागोर यांना २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास धरमपेठ बारबेरियम जीमजवळ गारमेंट्सचे दुकान चालवणाऱ्या ३० वर्षीय रितेश बैसवारे याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसर हादरून गेला होता. अंबाझरी पोलिसांनी रात्रीच आरोपींना पकडले होते. तेव्हापासून त्यांची विचारपूस सुरू आहे.
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी रितेश आणि इतर साथीदारांच्या मदतीने २०१० साली एका भाजपा आमदार पुत्राला जीएस कॉलेजवळ झोडपले होते. सीताबर्डी पोलीस ठाण्यात मारहाण आणि दंगा भडकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. आमदार पुत्राला मारहाण करण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणाला अतिशय गंभीरतेने घेतले होते. त्यामुळे अश्विनला आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. भविष्य खराब झाल्यामुळे अश्विनने रितेशची सोबत सोडली होती. अश्विन रितेशला टाळू लागत असल्याने रितेश त्याला वारंवार अपमानित करू लागला. रितेश आमदार निवासाच्या मागच्या बाजूला राहात होता. तेथून जीएस कॉलेज जवळ असल्याने तो नेहमीच कॉलेज परिसरात फिरत राहायचा. त्यामुळे कॉलेजमध्ये त्याचा दबदबा होता. तेव्हा त्याच्या वाट्याला फारसे कुणी जात नव्हते. दोन वर्षे बोलचाल बंद होती.
त्यानंतर पुन्हा दोघांमधील संबंध सामान्य झाले. पण काही दिवसांपूर्वी पुन्हा त्यांच्या संबंधात खडा पडला. परंतु आता रितेशचा दरारा अधिक वाढला होता. जीएस कॉलेजवळील त्याचे दुकानही चांगले चालायला लागले होते. आकर्षक व मजबूत शरीर असल्याने त्याची युवकांमध्ये चांगलीच चलती होती. यादरम्यान त्याने एक-दोनदा अश्विनला मारहाणसुद्धा केली होती. दिवाळीच्या वेळी संबंध सामान्य करण्याच्या उद्देशाने अश्विनने रितेशच्या दुकानातून कपडे खरेदी केले होते. परंतु त्यानंतरही रितेश त्याला अपमानित करीत होता. तो आपल्या मित्रांच्या माध्यमातून अश्विनला संपवण्याची धमकी देत होता. १५ दिवसांपूर्वीच अश्विनला माहिती झाले की, रितेश त्याचा खून करण्याच्या तयारीत आहे. आपल्या जीवाचा धोका त्याला सतावीत होता. त्यामुळे त्याने रितेशलाच संपविण्याची योजना आखली. परंतु रितेशला तो स्वत: संपवू शकत नाही, याची त्याला जाणीव होती. त्यामुळे त्याने निखिल आणि इतर साथीदारांना आपल्यासोबत घेतले. (प्रतिनिधी)
मिरची पावडरने योजना यशस्वी झाली
रितेश मजबूत बांध्याचा होता. त्यामुळे त्याच्यावर सरळ वार करणे शक्य नव्हते. त्यामुळे आरोपींनी अगोदर त्याच्या डोळ्यावर मिरची पावडर फेकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला मारण्यापूर्वी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर वार केले.
अगोदर ठेवली पाळत
अश्विनने काही दिवस रितेशच्या दैनंदिन कामावर लक्ष ठेवले. रितेश जीमला जातानाच एकटा राहत असल्याचे त्याच्या लक्षात आले. इतर वेळेस त्याच्यासोबत काही तरुण राहतात. त्यामुळे अश्विनने त्याला जीमजवळच संपविण्याची योजना आखली.
सराईत मेंदूचे कारस्थान?
आरोपींनी ज्या पद्धतीने हा खून केला, त्यावरून त्यांना एखाद्या सराईत मेंदूद्वारे मार्गदर्शन मिळाल्याची शंका निर्माण झाली आहे. आरोपी खरा प्रकार लपवीत आहेत. आरोपी आपल्या साथीदारांची नावे सांगण्यास टाळाटाळ करीत आहेत. सीसीटीव्हीमध्ये पाच ते सहा हल्लेखोर दिसून येत असताना आरोपी केवळ तीनजण असल्याचे सांगत आहेत.

Web Title: MLA's son's assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.