विनाअनुदानित शिक्षकांसाठी आमदार करणार उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 08:40 PM2018-11-26T20:40:09+5:302018-11-26T20:41:42+5:30

विनाअनुदानित शाळांचा प्रश्न पेटणार

mlas will go on fast for teachers working in non granted schools | विनाअनुदानित शिक्षकांसाठी आमदार करणार उपोषण

विनाअनुदानित शिक्षकांसाठी आमदार करणार उपोषण

Next

मुंबई : राज्यातील सर्व घोषित, अघोषित मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिक्षक आमदारांनीच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने प्रचलित नियमानुसार अनुदानाच्या प्रश्नासाठी १९ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या बहुतेक शिक्षक आमदारांनी तशी घोषणाच केली आहे. त्यामुळे विनाअनुदानित शाळांचा प्रश्न पेटला आहे.

अनुदानाच्या प्रश्नासाठी समितीचे हे १५२ वे धरणे आंदोलन असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली. ते म्हणाले की, शेकडो शिक्षक मुंबईत ठाण मांडून बसले आहेत, मात्र शासनाने त्यांची क्रूर थट्टा मांडली आहे. मराठी शाळेतील शिक्षकांसाठी बैठक घेण्यास मुख्यमंत्री, अर्थमंत्री व शिक्षण मंत्री यांना वेळ नाही. गेल्या सोमवारी शिक्षणमंत्री यांनी शिष्टमंडळाला गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे सांगितले होते. त्याचवेळी आपला प्रश्न सोडविण्यात येईल, असे जाहीरही केले. मात्र गुरुवारी सभागृहात शिष्टमंडळाला बोलावून ही बैठक सोमवारी दुपारी होईल, असे जाहीर केले. आता ही बैठक पुन्हा मंगळवारी होईल, असे कामचलाऊ उत्तर शिक्षणमंत्री देत आहेत. त्यामुळे शिक्षकवर्गात संतापाची लाट उसळल्याचे रेडीज यांनी सांगितले.

समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर यांनी सांगितले की, मंगळवारी बैठक न झाल्यास शेकडो शिक्षक, संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक आमदार नागो गाणार, शिक्षण परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू, खंडेराव जगदाळे  बुधवारपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत. तसेच उर्वरित शिक्षक व पदवीधर आमदारांनी एकत्र येऊन उपोषणास बसावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

...तर आझाद मैदानात आत्महत्या करू!
गेल्या सोमवारपासून विनाअनुदानित शाळा राज्यभर बंद आहेत. मात्र त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, यासाठी शासन प्रयत्न करीत नसून आता या शाळांना पाठिंबा देण्यासाठी अनुदानित शाळा, संस्थाचालक व मुख्याध्यापक संघटना मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारीही बैठक झाली नाही, तर आझाद मैदानातील झाडांवर शिक्षकांनी शेतकºयांसारखी आत्महत्या केल्यास त्याला सरकार जबाबदार राहील, असा इशाराच तात्यासाहेब म्हसकर यांनी दिला आहे.
 

Web Title: mlas will go on fast for teachers working in non granted schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.