MLC ELECTION : पदवीधर आणि शिक्षकांचा आमदार होण्यासाठी दहावी पासही रिंगणात, तसेच गंभीर गुन्ह्यांमधील आरोपीही
By तुळशीदास भोईटे | Published: June 21, 2018 03:50 PM2018-06-21T15:50:21+5:302018-06-21T15:50:21+5:30
कोकण मतदारसंघातील उमेदवार नजीब मुल्ला हे गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांच्या यादीत नंबर १ आहेत.
MLC ELECTION : पदवीधर आणि शिक्षकांचा आमदार होण्यासाठी दहावी पासही रिंगणात, तसेच गंभीर गुन्ह्यांमधील आरोपीही
विधानपरिषद हे ज्येष्ठांचे सभागृह मानले जाते. तेथे चांगले नागरिक प्रतिनिधी म्हणून असावेत यासाठी पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची तरतुद असते. मात्र यावेळी या मतदारसंघांमधील एक उमेदवार फक्त दहावी पास असून काहींच्या विरोधात गंभीर गुन्ह्यांचीही नोंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकण मतदारसंघातील उमेदवार नजीब मुल्ला हे गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांच्या यादीत नंबर १ आहेत. तर त्यांच्याच ठाण्यातील नगरसेवक शिवसेनेचे उमेदवार गुन्हे दाखल असलेल्यांच्या यादीत नंबर दोनवर आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार शिक्षक आणि पदवीधरांना प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून विधानपरिषदेत त्यांच्यासाठी असलेल्या खास मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमधील एका उमेदवाराची शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास आहे. इतर उमेदवारांमध्ये १६ पदवीधर, १४ व्यावसायिक पदवीधर, १६ पदव्युत्तर, ३ डॉक्टरेट अशा चांगल्या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांचा समावेश आहे.
एकीकडे शैक्षणिक पात्रतेत दर्जा सांभाळलेला असतानाच गुन्हेगारी नोंदींच्या बाबतीत मात्र दर्जा काहीसा घसरलेला दिसत आहे. गुन्हेगारी नोंदी असलेल्या उमेदवारांच्या यादीत पहिल्या नंबरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नजिब मुल्ला आहेत. खरेतर एकूण प्रकरणांच्याबाबतीत दुसरे ठाणेकर उमेदवार शिवसेनेचे संजय मोरे हे पुढे आहेत. मात्र त्यांच्याविरोधात एकही गंभीर कलम नाही. तर नजिब मुल्लांच्याविरोधात एका गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याने एडीआरच्या अहवालात ते पहिल्या नंबरवर झळकले असावेत. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष डॉमनिक डाबरे असून श्रीमंतांच्या यादीत पहिल्या नंबरवर असलेले नाशिकचे अपक्ष उमेदवार प्रतापराव सोनावणे यांचे नाव गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांच्या यादीत चौथ्या नंबरवर आहे. अर्थात गुन्ह्यांची नोंद असलेली ही यादी ५१ पैकी ८ उमेदवार असले तरी गुन्ह्यांमधील अनेक प्रकरणे ही राजकीय आंदोलनातील असण्याचीही शक्यता आहे.