"मुख्यमंत्र्यांचं वागणं धीरोदात्त, स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ठरल्याप्रमाणे बैठक घेतली"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 07:49 PM2020-06-15T19:49:35+5:302020-06-15T19:53:41+5:30

उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या कृतीनं साऱ्यांची मनं जिंकली. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी ‘धीरोदात्त मुख्यमंत्री’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे.

MLC Kapil Patil praises CM Uddhav Thackeray for his dedication towards work | "मुख्यमंत्र्यांचं वागणं धीरोदात्त, स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ठरल्याप्रमाणे बैठक घेतली"

"मुख्यमंत्र्यांचं वागणं धीरोदात्त, स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ठरल्याप्रमाणे बैठक घेतली"

Next

मुंबईः कोरोना संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचं विविध स्तरांतून कौतुक होतंय. प्रत्येक निर्णय संयमाने अन् विचारपूर्वक घेऊन त्यांनी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली, अशी दाद अनेक जण देत आहेत. कोरोना चाचणीचे शुल्क ५० टक्के कमी करून महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवण्याचे काम केले आहे, अशा शब्दांत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरनंही राज्य सरकारची पाठ थोपटलीय. या पार्श्वभूमीवरच, उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या कृतीनं साऱ्यांची मनं जिंकली.

उद्धव ठाकरे यांचे सासरे, रश्मी ठाकरेंचे वडील माधव पाटणकर यांचं आज सकाळी निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ठाकरे कुटुंबासाठी हा दुःखाचा प्रसंग असतानाही, मुख्यमंत्र्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांसोबत ठरलेली बैठक घेतली. त्याबद्दल शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा ‘धीरोदात्त मुख्यमंत्री’ म्हणून गौरव केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरेंच्या वडिलांचे निधन

"महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली, इतर राज्यांनी अनुकरण करावं"

‘राज्याची काळजी वाहणारे मुख्यमंत्री!’

कपिल पाटील आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितातः

‘‘मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे आज दुःखद निधन झाले. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबीयांच्या दुःखात आपण सारे सहभागी आहोत. निधनाची बातमी कळताच मी शिक्षण आयुक्त यांना मेसेज केला. शिक्षण विभागासोबत मुख्यमंत्री यांच्या Video Conference बद्दल विचारणा केली. तेव्हा शिक्षण आयुक्त यांनी खालील मेसेज पाठवला - 'Yes. Still he is taking the VC. Really appreciated. He took your name and other experts to involve in pilot for Tablets / online studies.'

घरात दुःखाचा आघात झाला असताना, मुख्यमंत्री यांनी शिक्षण विभागासोबत ठरलेली VC रद्द केली नाही. ती पूर्ण पार पाडली. इतर बैठकाही घेतल्या. मुख्यमंत्र्यांचं हे वागणं धीरोदात्त आहे, स्वतः चं दुःख बाजूला ठेवून राज्याची काळजी वाहणारं आहे.’’

मुख्यमंत्र्यांचं नवं मिशन! आज १२ मोठ्या करारांवर करणार स्वाक्षऱ्या

जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरु होणार, मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दर्शवला, पण...

जुलैमध्ये भरणार शाळा  

शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिक्षण तज्ज्ञांसोबत झालेल्या आजच्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन जुलै महिन्यात प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. एका महिन्याभरात एकही कोविड-१९ रुग्ण आढळला नसलेल्या भागात पुढच्या महिन्यापासून शाळा सुरू होतील. जुलै महिन्यापासून इयत्ता नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यात येतील. तर, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिन्यापासून शाळा सुरू होणार आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शाळा सप्टेंबरपासून सुरू होईल. दरम्यानच्या काळात डिजिटल माध्यमातून वर्ग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: MLC Kapil Patil praises CM Uddhav Thackeray for his dedication towards work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.