पॅथॉलॉजिस्टसाठी एमएमसी आखणार नियमावली

By admin | Published: August 9, 2015 02:44 AM2015-08-09T02:44:53+5:302015-08-09T02:44:53+5:30

निदानाचा काळा बाजार करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या पॅथॉलॉजिस्ट आणि अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कारवाईचा बडगा उचलणार आहे. पॅथॉलॉजिस्टसाठी

MMC rules for pathologists | पॅथॉलॉजिस्टसाठी एमएमसी आखणार नियमावली

पॅथॉलॉजिस्टसाठी एमएमसी आखणार नियमावली

Next

मुंबई : निदानाचा काळा बाजार करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या पॅथॉलॉजिस्ट आणि अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कारवाईचा बडगा उचलणार आहे. पॅथॉलॉजिस्टसाठी परिषद धोरणात्मक निर्णय घेणार असून, नियमावली आखणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी दिली.
गल्लीबोळात छोट्या गाळ्यातही पॅथॉलॉजी लॅब थाटून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबचे स्टिंग आॅपरेशन ‘लोकमत’ने केले होते. यावेळी मुंबईसारख्या शहरातही अशा लॅब सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे एकाच पॅथॉलॉजिस्टच्या नावाने अनेक लॅबमधून रिपोर्ट निघत असल्याचेही उघड झाले होते. काही पॅथॉलॉजिस्ट कोऱ्या रिपोर्टवर सही करून त्या बदल्यात अनधिकृत लॅबवाल्यांकडून पैसे घेतात, असे प्रकार घडत आहेत. या विषयाची परिषदेने आता गंभीर दखल घेतली आहे. रुग्णांना केंद्रस्थानी ठेऊन परिषद या प्रकारांना आळा घालण्यासाठी कारवाई करणार आहे. योग्य ती तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. टावरी यांनी सांगितले.
परिषदेकडे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेने बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या ५ पॅथॉलॉजिस्टच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. एक डॉक्टर हा महापालिकेच्या सायन रुग्णालयात रक्तपेढीत काम करीत असूनही
इतर पॅथॉलॉजी लॅबच्या रिपोर्टवर
सह्या करीत असल्याचे आढळून आले आहे. प्रत्यक्षात नियमांप्रमाणे त्यांना पॅ्रक्टिस करण्याची परवानगी नाही.
या प्रकरणांची दखल घेत परिषद आता यासंदर्भात एका समितीची स्थापना करणार आहे. या समितीत परिषदेचे सदस्य, असोसिएशनचे सदस्य आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असणार आहेत. कायद्यात एका पॅथॉलॉजिस्टनी किती ठिकाणी प्रॅक्टिस करावी हे नमूद
केलेले नाही, तरीही शारीरिकदृष्ट्या आणि तात्त्विकदृष्ट्या विचार करता एकच पॅथॉलॉजिस्ट एका दिवसांत
१८ ते २० ठिकाणी जाऊ शकत
नाही. यामुळे होणारे काम हे अनधिकृत आहे.
या प्रकारांना आळा घालण्यासाठी परिषद योग्य ती कारवाई करेल, असे परिषदेचे कार्यकारी सदस्य डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले.

मुख्य कार्यालयात झाली सुनावणी
शनिवारी परिषदेच्या चिंचपोकळी येथील मुख्य कार्यालयात सुनावणी झाली. एक पॅथॉलॉजिस्ट २८ पॅथॉलॉजी लॅबमध्ये सही करून रिपोर्ट देत असल्याचे उघड झाले. ज्या इतर पॅथॉलॉजिस्टच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याविरूद्ध असोसिएशनने पुरावे सादर केले आहेत.

Web Title: MMC rules for pathologists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.