' ऐ दिल है मुश्किल'च्या विरोधात मनसेचे करण जोहरच्या ऑफीसबाहेर निदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2016 12:56 PM2016-09-27T12:56:52+5:302016-09-27T16:36:57+5:30
पाकिस्तानी कलाकार फवाद खानची भूमिका असलेल्या ' ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाला विरोध दर्शवत मनसे कार्यकर्त्यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या ऑफीसबाहेर निदर्शने केली.
मुंबई, दि. 27 - पाकिस्तानी कलाकारांना हिंदी सिनेजगताने कामे देऊ नयेत, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता कडक पवित्रा घेतला आहे. आज दुपारी 12च्या सुमारास अंधेरी (पश्चिम)येथील करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या कार्यालयाबाहेर मनसैनिकांनी निषेध व्यक्त करत आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पाकिस्तानी कलाकार फवाद खान याला घेऊन ह्यए दिल है मुश्कीलह्ण हा सिनेमा बनवणा-या करण जोहरने परवा पाकिस्तानी कलाकारांवर निर्बंध घालणे गैर असल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्याच्या या मताचा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी कडक समाचार घेतला. शालिनी ठाकरे म्हणाल्या, करोडो भारतीय करण जोहर यांचे सिनेमे बघतात. त्याच्या जोरावरच ते करोडो रुपये कमवतात. मग भारतीयांच्या भावनांचा आदर का केला जात नाही?
मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर व कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात करण जोहरला लिहिलेले पत्र घेऊन मनसेचे पदाधिकारी आज करण जोहरच्या कार्यालयात गेले होते. या पत्रात पाकिस्तानी कलाकार असलेला सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याची स्पष्ट ताकीद देण्यात आली होती. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर करण जोहरचा निषेध करत घोषणाबाजी केली. याविरोधात कारवाई करत आंबोली पोलिसांनी मनसेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई, विशाल हरयान, रशीद शेख, प्रदीप पांचाळ, सचिन तळेकर, प्रशांत राणे, छतील सावंत, विशाल हळदणकर, देवेंद्र मांजरेकर, गोविंद मालवीय या कार्यकर्त्यांना अटक केली.