मनसैनिकांचा ठाण्यात हैदोस
By admin | Published: January 21, 2017 04:33 AM2017-01-21T04:33:02+5:302017-01-21T04:33:02+5:30
मनसेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी अक्षरश: हैदोस घालत ठाणेकरांच्या नाकीनऊ आणले.
ठाणे : नाशिकमधील विकासकामांच्या आधारे ठाण्यात मते मागणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी अक्षरश: हैदोस घालत ठाणेकरांच्या नाकीनऊ आणले.
स्वागतासाठी पदाधिकाऱ्यांसह अनेक मनसैनिक दुचाकी आणि चारचाकीतून चेकनाका येथे आले होते. थोड्या वेळाने दुचाकीवरील मनसैनिकांना श्री माँ बालनिकेतन शाळेजवळ थांबण्यास सांगण्यात आले. तेव्हा जोरजोरात हॉर्न वाजवत दुचाकीवरून जात त्यांनी रस्त्याच्या मधोमध उभे राहून वाहतूककोंडी केली. काही जण बुलेटच्या सायलेन्सरमधून आवाज काढत स्टंट करत होते. बससमोर त्यांनी फटाके फोडले. त्यांना शाळेसमोर कचरा करून ध्वनिप्रदूषणात भर घालतोय, याचे भान उरले नव्हते. पिण्याच्या पाण्याचे ग्लास, प्लास्टीकच्या बाटल्याही त्यांनी रस्त्यातच टाकल्या. ग्लासेसचे खोकेही रस्त्यात फेकून दिले. एकेका दुचाकीवर तीन जण बसून जात होते. रस्त्यावरून जाताना किंकाळ्या फोडत, कर्कश हॉर्न वाजवत होते. कोपरीतून ठाणा कॉलेजसमोरील कार्यालयाजवळ तेथून सीकेपी फूड फेस्टिव्हलपर्यंत सर्व मार्गावर हा धुडगूस बराच काळ सुरू होता. (प्रतिनिधी)
>‘आम्ही कार्यकर्ते नाही’ : आम्ही मनसेचे कार्यकर्ते नाही. आम्हाला बोलवले म्हणून आम्ही आलो. इथून कुठे जायचे याची माहिती आम्हाला नाही, अशी प्रतिक्रिया राज यांच्या स्वागताला आलेल्यांपैकी अनेक तरुण मंडळींची होती.
योग्य वेळ आली की बोलेन - राज ठाकरे
मी आता बोलणार नाही, योग्य वेळ आली की बोलेन, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. ठाण्यात पक्षाच्या १६ निवडणूक कार्यालयांच्या उद््घाटनासाठी ते आले होते. याच दौऱ्यात त्यांनी सीकेपी फूड फेस्टिव्हलला भेट दिली. तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर आता काहीही बोलणार नाही, असे सांगितले.
इथे खायला तोंड उघडायचे असते. बोलायला नाही. इथे सर्व जण पदार्थांचा आस्वाद घेत आहेत. त्यामुळे खवय्यांमध्ये मी लुडबुड करणार नाही, अशी कोपरखळी त्यांनी मारली. ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव व कार्यकर्त्यांनी राज यांचे स्वागत केले. या वेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, अभिजित पानसे आदी उपस्थित होते. व्यासपीठावरून राज खाली उतरताच त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यास उपस्थितांनी गर्दी केली.