राणीबागेतील समस्यांवरून मनसे आक्रमक
By Admin | Published: May 9, 2017 01:46 AM2017-05-09T01:46:49+5:302017-05-09T01:46:49+5:30
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेतील तिकीट दरवाढीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेतील तिकीट दरवाढीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथील नागरी समस्या सोडवण्याची मागणी करत मनसेने प्रस्तावित तिकीट दरवाढ रद्द करण्याचे आवाहन सोमवारी प्रशासनाला केले आहे.
यासंदर्भात मनसेचे विभागाध्यक्ष विजय लिपारे यांनी संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांची भेट घेतली. लिपारे म्हणाले की, राणीबागेतील प्रस्तावित तिकीट दरवाढ ही पेंग्विनचा देखभाल खर्च भागवण्यासाठी होत आहे. संपूर्ण राणीबागेतील पिंजऱ्यांमध्ये असलेल्या प्राण्यांची संख्या नगण्य आहे. मात्र तरीही पेंग्विनचा खर्च भागवण्यासाठी प्रशासनाकडून तिकीट दरवाढ करण्यात येणार आहे. त्याचा फटका वृक्षप्रेमींना बसणार आहे. राणीबागेत असलेल्या दुर्मीळ वृक्ष आणि रोपट्यांचा अभ्यास करण्यासाठी शेकडो वृक्षप्रेमी आणि विद्यार्थी या ठिकाणी येतात. त्यामुळे प्रस्तावित दरवाढ ही उद्यान पाहण्यासाठी लागू न करता केवळ पेंग्विनपुरती मर्यादित ठेवावी.
नागरी समस्यांबाबत सांगताना लिपारे म्हणाले की, राणीबागेत पर्यटकांना मार्गदर्शन करणाऱ्या दिशादर्शक फलकांची संख्या वाढवावी. तसेच सर्व फलक योग्य ठिकाणी आणि ठळक अक्षरांत लावावेत.
राणीबागेचे मुख्य प्रवेशद्वार दुपारी ३ वाजताच बंद करण्यात येत असल्याने पर्यटकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते. परिणामी मुख्य प्रवेशद्वार सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुले ठेवण्याची मागणी मनसेने केली आहे.