राऊतांच्या टीकेवर मनसेचाही खोचक टोला; 'नॉटी राऊत' म्हणत पूर्वीची विधानं ऐकवली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 11:03 AM2024-03-20T11:03:20+5:302024-03-20T11:04:37+5:30
राज-अमित शाह भेटीवरून संजय राऊतांनी टीका केली होती. राज ठाकरेंनी काढलेले जुनं व्यंगचित्र राऊतांनी पोस्ट करत मनसेला टोला लगावला होता. त्याला आता मनसेनेही तसेच उत्तर दिले आहे.
मुंबई - MNS on Sanjay Raut ( Marathi News ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले, त्यानंतर मनसे-भाजपा युती होईल अशी चर्चा सुरू झाली. त्यात विरोधकांनी मनसेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. त्यात प्रामुख्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी काढलेले जुने व्यंगचित्र ट्विट करून मनसेला टोला लगावला. मोदी-शाहांवर टीका करताना राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र २०१९ मध्ये काढलं होतं. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही संजय राऊतांना जुन्या विधानांचा दाखला देत खोचक प्रतिटोला लगावला.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत अप्रतिम! अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेला व्हिडिओ, मुख्य कलाकार अर्थातच "नॉटी राऊत " म्हणत एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात संजय राऊतांच्या मुलाखतींमधील विविध विधाने आहेत ज्यात राऊत मोदी-शाहांचे आणि भाजपाचे तोंडभरून कौतुक करताना दिसतात. या व्हिडिओत संजय राऊत बोलतायेत की, भाजपाला आम्ही नेहमीच देशाच्या राजकारणात मोठ्या भावाचा दर्जा दिलाय. मोदींच्या उंचीचा देशात कुणी नेता नाही. येणाऱ्या २५ वर्षात बनण्याची शक्यताही नाही. चौकीदार खूप विश्वसनीय आहे. आम्ही त्यांच्यावर भरवसा ठेवू शकतो असं राऊतांनी म्हटलं होते.
अप्रतिम!
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 20, 2024
अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेला व्हिडीओ
मुख्य कलाकार अर्थातच "नॉटी राऊत " pic.twitter.com/Er2b1P8DvE
तसेच मोदी-शाह हेच आमच्यासाठी सुप्रीम कोर्ट आहेत. मोदींच्या तुलनेत राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव अथवा महाराष्ट्रात शरद पवार असो कुणालाही जनतेने स्वीकार केले नाही. पंतप्रधान मोदींसमोर कुठल्याही नेत्याला जनता स्वीकारणार नाही. भाजपा देशाच्या राजकारणात आमच्या मोठ्या भावाची भूमिका नेहमी निभावणार आणि आम्ही ते स्वीकारही करतो. मोदींचे नेतृत्व विश्वासपात्र आहे असंही राऊतांनी सांगितले होते.
त्यासोबतच राऊतांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेचाही उल्लेख या व्हिडिओत आहे. राहुल गांधी म्हणत होते, नरेंद्र मोदींची जमेची बाजू म्हणजे ती त्यांची प्रतिमा, मी ते भंग करेन. मात्र हे लोकांना आवडलेले नाही. कुणीही कुणाची प्रतिमा भंग करू शकत नाही. नरेंद्र मोदींची प्रतिमा जनतेत खूप चांगली आहे. मोदींचा प्रतिमा भंग करण्यात राहुल गांधी अयशस्वी ठरले असंही संजय राऊतांनी मागे म्हटल्याची आठवण मनसे नेते संदीप देशपांडेंनी करून दिली.