Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर दौरे केले असते का? अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 12:23 PM2022-08-06T12:23:21+5:302022-08-06T12:24:17+5:30
Maharashtra Political Crisis: तेजस ठाकरे राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे अमित ठाकरेंनी म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis: एकीकडे शिंदे गटाने केलेले बंड, शिवसेनेवर आलेले ऐतिहासिक संकट या पार्श्वभूमीवर दुसरीकडे मनसे पक्षसंघटना वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विविध ठिकाणी दौरे काढत असून, पक्ष मजबूत करण्याच्यादृष्टीने पावले टाकत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, तेही राज्यभर दौरे काढत आहेत. यावरून अमित ठाकरे यांनी टीका केली आहे.
अमित ठाकरे मनसेमध्ये पुन्हा नव्याने उत्साह भरण्यासाठी कामाला लागले आहेत. सर्वसामान्य लोकांशी, तरुणांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. राज्यात आगामी कालावधीत अनेकविध निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्याबाबत बोलताना, येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या निवडणुकीत सक्षम उमेदवार द्यायचा आहे आणि तो निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचे आहेत. त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी तयार आहे. कुठलीही निवडणूक लागली तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू. आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आहे आणि जिंकायचीदेखील आहे. त्यामुळे मनसैनिकांनो, कामाला लागा, अशा सूचना अमित ठाकरे यांनी दिल्या आहेत.
...तर दौरे केले असते का?
शिवसेना ऐतिहासिक संकटात असून, आदित्य ठाकरे यांचे झंझावती दौरे सुरू आहेत. यावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरू केलेत. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे यांचे बंड झाले नसते तर तुम्ही दौरा केला असता का, एवढाच माझा एक प्रश्न आहे, असे अमित ठाकरे म्हणाले. तसेच तेजस ठाकरे ठाकरे राजकारणात सक्रीय होत आहेत, अशा चर्चा आहेत. त्यावर अमित ठाकरेंनी भाष्य केलेय. तेजस ठाकरे राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडून पुत्र तेजस ठाकरे यांच्यावरही युवासेनेची मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. या चर्चेबाबत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी खुलासा केला आहे. आदित्य ठाकरे यांनी तेजस ठाकरेंच्या सक्रिय राजकारणातील एण्ट्रीची चर्चा फेटाळून लावली आहे. या चर्चेवर विश्वास ठेवू नका. त्याला जेव्हा यायचे, तेव्हा तो याबाबत निर्णय घेईल, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.