“१०० टक्के आपली कामे पूर्ण होतील, लवकरच आपण सत्तेत असू”; अमित ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 05:49 PM2023-05-01T17:49:18+5:302023-05-01T17:50:17+5:30
MNS Amit Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना अमित ठाकरे यांनी हा विश्वास व्यक्त केला.
MNS Amit Thackeray: अलीकडील काळात पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावरून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचे बॅनर राज्यातील काही ठिकाण लागल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यावरून केवळ महाविकास आघाडीत नाही तर राष्ट्रवादीतही मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहेत. शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असावेत, असे म्हणत आहेत. तर भाजपवाले देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे सांगत आहेत. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी केलेल्या विधामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
एका कामगार मेळाव्यात अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे सहभागी झाले होते. या सभेला संबोधित करताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, अमित राजकारणात आल्यापासून आळशी झाली आहे. इथे येणार नव्हते पण फक्त तुमच्यासाठी आले. कामगार कपात सगळीकडे सुरु आहे. त्यात आपण कामगारांना न्याय देत आहात. तुमच्या कामाचा कौतुक करण्यासाठी आले आहे. पुढच्या वर्षी येणार नाही कारण पुढच्या वर्षी माईक हा अमितच्या हातात गेला पाहिजे. बाकीच्यांची टीम ६० प्लस आहे. आपली टीम तरुण आहे. कठीण काळात तुम्ही कामगारांना न्याय मिळवून देत आहात. सगळ्यांनी चांगले काम केले आहे, म्हणून एवढे युनिट वाढले आहेत, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या मेळाव्याला अमित ठाकरे यांनीही संबोधित केले.
१०० टक्के आपली कामे पूर्ण होतील, लवकरच आपण सत्तेत असू
या मेळाव्यात बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, वास्तविक पाहता या मेळाव्यासाठी निमंत्रण आले तेव्हा माझा आधीच एक कार्यक्रम ठरलेला होता. मात्र, तुमच्यासाठी इथे आलो आहे. इथे फक्त कामगार सेनेची ताकद बघायला आलो आहे. तुम्ही उगाच माझे नाव घेतात. हे सगळे तुमचे कष्ट आहेत. तुम्ही म्हणतात ५० टक्के कामे होतात, काही कामे होत नाहीत. कधी कामे होत नाहीत. आपण लवकरच सत्तेत असू, आपली १०० टक्के कामे पूर्ण होतील, असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सध्या राजकारणात कुस्त्या सुरु आहेत. उद्धव ठाकरेंची कुस्ती एकनाथ शिंदेंसोबत सुरु आहे तर फडणवीस सोबत सुद्धा कुस्ती सुरु आहे. संजय राऊत विरुद्ध नितेश राणे अशी कुस्ती सुरु आहे. अजित पवार यांची घरातच कुस्ती सुरु आहे. बारसूमध्ये पण कुस्ती सुरु आहे. कोण कोणाच्या समर्थनार्थ आहे कोण विरोधात हेच कळत नाही. राज ठाकरे यांची या कुस्तीत एन्ट्री होईल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"