मनसेच्या पहिल्या यादीत ५४ उमेदवारांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2017 02:31 PM2017-02-03T14:31:40+5:302017-02-03T14:33:46+5:30
नऊ नगरसेवकांना उमेदवारी : तीन माजी नगरसेवकांचाही समावेश
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्यांबाबत घोळ सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ५४ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (दि.२) सायंकाळी घोषित करत आघाडी घेतली. मनसेने भाजपा नगरसेविकेबरोबरच पक्षाच्या आठ नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पहिल्या यादीत महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह शहराध्यक्ष राहुल ढिकले, नगरसेवक यशवंत निकुळे, सुजाता डेरे व रेखा बेंडकोळी यांची नावे नाहीत.
महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शुक्रवारी (दि.३) अखेरचा दिवस आहे. गुरुवारी दिवसभर राजकीय पक्षांकडून घोषित होणाऱ्या उमेदवारांच्या यादीची प्रतीक्षा होती. त्यात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मनसेने सर्वांत प्रथम आघाडी घेत आपल्या ५४ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली. पहिल्या यादीत प्रामुख्याने, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, सभागृहनेत्या सुरेखा भोसले, मेघा साळवे, सविता काळे, कांचन पाटील, गटनेता अनिल मटाले आणि अर्चना जाधव तसेच स्वीकृत नगरसेवक संदीप लेनकर यांचा समावेश आहे. याशिवाय, चार-पाच दिवसांपूर्वीच भाजपातून मनसेत दाखल झालेल्या विद्यमान नगरसेवक ज्योती अर्जुन गांगुर्डे यांना प्रभाग ३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माजी नगरसेवक अनंत सूर्यवंशी, सेनेचे माजी नगरसेवक अस्लम मणियार, सेनेचेच माजी नगरसेवक बाळासाहेब मटाले यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांच्या पत्नी शेख फरिदा यांना प्रभाग १० मधून उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पहिल्या यादीत महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष राहुल ढिकले यांची नावे नाहीत परंतु, कुंपणावर असलेल्या यशवंत निकुळे, रेखा बेंडकुळी यांचाही समावेश नसल्यामुळे चर्चेला उधाण आले होते.