"मंदिरात सीसीटीव्ही, तर मशिंदींमध्ये का नाही?," मनसेच्या मागणीला गृहमंत्र्यांचं एका वाक्यात उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 05:37 PM2022-04-20T17:37:49+5:302022-04-20T17:37:55+5:30
मनसेनं आता भोंग्यांच्या मुद्द्यानंतर सीसीटीव्हीचा मुद्दा समोर आणला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात भोंग्याचा प्रश्न तापला आहे. काही मशिदींनी पुढाकार घेत या मागणीचे स्वागत केले आहे. मात्र, यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. नुकतंच हनुमान जयंतीदिनी या मुद्द्याचा राजकीय परिणाम झाल्याचे दिसून आले. मनसेनं आता भोंग्यांच्या मुद्द्यानंतर सीसीटीव्हीचा मुद्दा समोर आणला आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी जवळपास सर्व मंदिरात सीसीटीव्ही लावले आहेत, पंरतु मशिदीत सीसीटीव्ही आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“मंदिरांमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य करण्यासंदर्भात कोणी सूचना कोणी दिलेल्या नाहीत. मंदिरात जर कोणी स्वेच्छेनं, सुरक्षिततेच्या दृष्टीनं जर सीसीटीव्ही लावले असतील आणि अन्य बाकीच्या प्रार्थना स्थळांमध्ये ज्यांना सीसीटीव्ही बसवायचे असतील त्याला सरकारचा विरोध असण्याचं कारण नाही. आपल्या स्वेच्छेनं त्यांनी निर्णय घ्यावा,” असं वळसे पाटील म्हणाले.
जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत,परंतु मस्जिदीत CCTV आहेत का? "सर्वधर्मीय" प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये?हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल.तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) April 19, 2022
काय म्हणाले बाळा नांदगावकर?
“जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत, परंतु मशिदींमध्ये CCTV आहेत का? "सर्वधर्मीय" प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये? हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी,” असं बाळा नांदगावकर म्हणाले होते. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली.