“बृजभूषण सिंहांच्या कार्यक्रमाला ५ लाख नाही, तर फक्त २५०० लोक”; मनसेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 12:18 PM2022-06-06T12:18:06+5:302022-06-06T17:53:17+5:30
साधू-संत-महतांनाही राज ठाकरे अयोध्येत यावे, असे वाटत असल्याचे मनसेने म्हटले आहे.
मुंबई: विविध नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौरा पुढे ढकलला असला, तरी युवा नेते प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा अयोध्या दौरा निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. यातच राज ठाकरे अयोध्येत पोहोचले नसले, तरी मनसे नेते अविनाश जाधव काही कार्यकर्त्यांसह ५ जूनला अयोध्येला पोहोचले. त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या दावा खोडून काढला असून, त्यांच्या कार्यक्रमाला ५ लाख नाही, तर केवळ २५०० जण जमल्याचे मनसेने म्हटले आहे.
राज ठाकरे अयोध्येत येतील त्यादिवशी बृजभूषण सिंह यांनी समर्थकांसह शरयू स्नानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला तब्बल पाच लाख लोक जमतील, असा दावा बृजभूषण सिंह यांनी केला होता. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतरही बृजभूषण सिंह आपल्या भूमिकेवर ठाम होते. राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी आयोजित केलेले त्यांचे सर्व कार्यक्रम नियोजनानुसार पार पडले होते.
संत-महंतांना राज ठाकरेंनी अयोध्येत यावे असेच वाटतेय
शरयू नदीवरील आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये अविनाश जाधव म्हणाले की, आम्ही शरयू नदीच्या काठावर गेलो होतो. तिथे फारतर १०० ते १५० लोक जमले होते. त्यानंतर कार्यक्रम सुरु होईपर्यंत याठिकाणी दोन-अडीच हजारांचीच गर्दी जमली होती, असा दावा अविनाश जाधव यांनी केला. या सगळ्यावरुन बृजभूषण सिंह यांची ताकद किती आहे, हे समजले. राज ठाकरे यांच्या सभेला त्यांना ऐकण्यासाठी लाखो लोक येतात. पण बृजभूषण सिंह यांना पाच लाख लोक येतील असा दावा करून त्याठिकाणी प्रत्यक्षात दोन-अडीच हजार जणच आले. अयोध्येत असताना तेथील अनेक लोकांशी, साधू-महंतांशी संवाद साधला. या सगळ्यांना राज ठाकरेंनी अयोध्येत यावे, असे वाटत असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, मनसे नेते अविनाश जाधव आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले. आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. आम्ही ठरवल्यावर कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण करतोच. कोणीही मराठी माणसाला आव्हान द्यायचे नाही. आम्ही आलोय, आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. आम्हाला धमक्या द्यायचे बंद करा. ज्यादिवशी राज ठाकरे आदेश देतील तेव्हा या सगळ्यांना यांची जागा आम्ही दाखवून देऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी थेट अयोध्येतून दिला.