गडकरीजी, देशात प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या: राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 10:23 AM2022-03-26T10:23:54+5:302022-03-26T10:25:30+5:30

राज ठाकरे यांनी दिला आपल्या आठवणींना उजाळा. गडकरींकडे केली मोठी विनंती.

mns chief raj thackeray asked nitin gadkari to make big project and give name of lata mangeshkar remembers memories pandit hrudaynath mangeshkar lifetime achievement award | गडकरीजी, देशात प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या: राज ठाकरे

गडकरीजी, देशात प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या: राज ठाकरे

Next

"जगाच्या पाठीवर तुम्हाला अशी इमारत कुठेही सापडणार नाही, ज्याच्या एका मजल्यावर लता दीदी राहायच्या, जिथे आशाताई राहायच्या, पंडित हृदयनाथ मंगेशकर राहतात, उषाताई राहतात, मीनाताई येऊनजाऊन असतात, अशा एका मजल्यावर या देशातल्या चित्रपटसृष्टीतील-संगीत क्षेत्रातील २०-२२ हजार गाणी आहेत. अशा प्रकारची वास्तू जगाच्या पाठीवर कुठे असेल असं मला वाटत नाही. येता जाता मी त्या इमारतीला नमस्कार करतो," असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना झी २४ तास या वृत्तवाहिनीतर्फे 'अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगेशकर कुटुंबीयांसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लता दीदींचं नाव द्या अशी विनंती केली.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. "आजही लता मंगेशकर असं म्हटल्यावर अजूनही चाचपडतोय, आपल्याला लता मंगेशकर सापडलेल्या नाहीत. ज्या दिवशी दीदी गेल्या त्या दिवशी मला एक व्यक्ती भेटल्या. ते म्हणाले लता दीदींना तुम्ही पाहिलंय, भेटलाय तुम्ही, आम्ही त्यांना भेटलो नाही, आम्ही त्यांना ऐकत आलोय आणि ऐकत राहू आमच्यासाठी त्या कुठे गेल्या," अशी एक आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.

मोठ्या प्रोजेक्टला लतादीदींचं नाव द्या 
"पंडितजींचा संगीताचा प्रवास हा विलक्षण आहे. महाराष्ट्र राज्यानं या सर्वांना उचलून धरलं पाहिजे. तुम्ही देशात मोठमोठे प्रोजेक्ट्स करत असता, देशातला एक प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या. तो इतका विलक्षण आणि मोठा प्रोजेक्ट असला पाहिजे, ज्याला दीदींचं नाव शोभलं पाहिजे," अशी विनंतीह त्यांनी गडकरींकडे केली. अनेकदा मी मित्रांशी, सहकाऱ्यांशी बोलत असतो या देशात कलाकार, संगीतकार, गायक, नाट्यक्षेत्र, साहित्य, कवी, चित्रपटक्षेत्र ही सर्व मंडळी या देशात नसती तर कधीच अराजक आलं असतं. आपण यांच्यात गुंतून पडलो, त्यांच्यावर प्रेम केलं, त्यात शिरलो म्हणून इतर वाईट गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं. यांचे आभार मानावे तर कसे हेच समजत नाही असंही ते म्हणाले. 

Web Title: mns chief raj thackeray asked nitin gadkari to make big project and give name of lata mangeshkar remembers memories pandit hrudaynath mangeshkar lifetime achievement award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.