'राज'गर्जनेची तयारी! पुण्यात शेकडो पुरोहितांकडून मंत्रोच्चार, तर सभास्थळी अमित ठाकरेंची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 08:58 AM2022-04-30T08:58:15+5:302022-04-30T10:07:48+5:30
औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उद्याच्या सभेची उत्सुकता मनसैनिकांमध्ये दिसून येत आहे. तसंच राज ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागून राहिलं आहे.
औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उद्याच्या सभेची उत्सुकता मनसैनिकांमध्ये दिसून येत आहे. तसंच राज ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागून राहिलं आहे. राज ठाकरे उद्याच्या सभेपूर्वी कालच पुण्यात पोहोचले आहेत. थोड्याच वेळात ते औरंगाबादसाठी रवाना होणार आहेत. पुण्यातून निघण्यापूर्वी १०० ते १५० पुरोहित राज ठाकरेंना आशीर्वाद देण्यासाठी सकाळीच राजमहल येथे पोहोचले आहेत. उद्याची सभा निर्विघ्न व्हावी यासाठी राज ठाकरेंना शुभाशिर्वाद देण्यासाठी आम्ही आलो आहोत, असं पुरोहितांनी सांगितलं.
दुसरीकडे राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे औरंगाबादमध्ये पोहोचले असून ते सभास्थळाची पाहणी करण्यासाठी निघाले आहेत. सभास्थळावरील व्यवस्थेची ते पाहणी करणार आहेत. मनसेकडून सभेची पूर्ण तयारी झाली असून व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला व्हिडिओ स्क्रीन लावण्यसाठीही जागा सोडल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे उद्याच्या सभेत राज ठाकरे पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ करणार असल्याचं बोललं जात आहे. अर्थात यात औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याची शक्यता आहे. यात राज ठाकरे शिवसेनेनं दिलेल्या आश्वासनांचे आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे व्हिडिओ दाखवण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.
राज ठाकरे औरंगाबादला जाण्यासाठी नगरमार्गे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर येथे मनसेकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. यावेळी राज यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचा मोठा ताफाही उपस्थित असणार आहे.