कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही! उद्याच्या महाआरतीवरून राज ठाकरेंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 03:42 PM2022-05-02T15:42:39+5:302022-05-02T15:43:06+5:30

अक्षय्य तृतीयेनिमित्त आयोजित महाआरतीसंदर्भात राज ठाकरेंची महत्त्वपूर्ण घोषणा

mns chief raj thackeray cancels maha aarti on akshaya tritiya | कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही! उद्याच्या महाआरतीवरून राज ठाकरेंची मोठी घोषणा

कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही! उद्याच्या महाआरतीवरून राज ठाकरेंची मोठी घोषणा

Next

मुंबई: अक्षय्य तृतीयेनिमित्त मनसेकडून राज्यभरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. तसे आदेश मनसेचे अध्यक्ष राज यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र आता राज यांनी महाआरती रद्द केली आहे. उद्या राज्यात कुठेही आरत्या करू नका. कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही, अशा शब्दांत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात राज यांनी एक ट्विट केलं आहे.

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज यांनी सरकारला ३ तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. ४ मेपासून गप्प बसणार नाही, असा इशाराच राज यांनी काल औरंगाबादच्या सभेतून दिला. उद्या देशभरात ईद साजरी होणार आहे. त्यासोबतच उद्या अक्षय्य तृतीयादेखील आहे. यानिमित्तानं मनसेकडून राज्यभरात आरत्यांचं आयोजन करण्यात येणार होतं. मात्र राज यांनी हा कार्यक्रम रद्द केला आहे. तशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

राज यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण नेमकं पुढे काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन, असं राज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

काल काय म्हणाले राज ठाकरे?
३ तारखेला ईद आहे. त्या सणाला गालबोट लावायचं नाही. पण ४ तारखेपासून ऐकणार नाही. जिथे जिथे मशिदींवर भोंगे असतील, त्या त्या ठिकाणी लाऊड स्पीकरवर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल. यांना विनंती करून समजत नसेल, तर मग आमच्यासमोर पर्याय नाही, अशा शब्दांत राज यांनी थेट इशारा दिला.

राज यांचं भाषण सुरू असताना मशिदीतून अजानचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर राज यांनी आक्रमक पवित्रा घेतला. 'माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. हे जर सभेवेळी बांग सुरु करणार असतील, तर यांच्या तोंडात बोळा कोंबा. यांना सरळ शब्दांत सांगून कळत नसेल, तर राज्यात काय होईल ते मला माहीत नाही,' असं राज ठाकरे म्हणाले.

मशिदीतून सुरू झालेला भोंगा आताच्या आता बंद करा. नीट सांगितलेलं कळतच नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे, असा इशाराच राज यांनी दिला. आम्ही ४ तारखेपासून अजिबात शांत बसणार नाही. महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, ती यांना दाखवावीच लागेल. देशातल्या हिंदूंना माझी विनंती आहे. ४ तारखेपासून ज्या ज्या मशिदींसमोर भोंगे दिसतील, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा आणि अनेक वर्षे जुना असलेला हा प्रश्न सोडवा, असं आवाहन राज यांनी केलं.

Web Title: mns chief raj thackeray cancels maha aarti on akshaya tritiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.