राज ठाकरे यांच्यावर जामीनपात्र गुन्हा; भाेंग्याच्या आंदाेलनावर मात्र ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 05:21 AM2022-05-04T05:21:47+5:302022-05-04T05:22:19+5:30
भोंगे काढण्याबाबत दिलेल्या इशाऱ्यावर राज ठाकरे ठाम.
औरंगाबाद/मुंबई : येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषण करून सभेसाठी दिलेल्या अटी, शर्तीचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवत सिटी चौक पोलीस ठाण्यात राज यांच्यासह सभेचे संयोजक राजीव जावळीकर व इतरांविरोधात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला. तर शिवाजी पार्क पोलिसांकडून कलम १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र तरीही भोंगे काढण्याबाबत दिलेल्या इशाऱ्यावर राज ठाकरे ठाम आहेत.
पाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी केली होती. या मागणीवरून राज्यात दोन धर्मांत तणाव निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दिनाच्या सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली होती.
भोंगे तिथे हनुमान चालीसा!
मशिदींवरील भोंग्याविरोधातील आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत राज ठाकरे यांनी बुधवारपासून आंदोलनाची घोषणा केली आहे, तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकणार की सत्तेवर ज्यांनी बसवले त्या शरद पवारांचे, याचा फैसला एकदा जनतेसमोर होऊन जाऊ दे, अशा शब्दांत राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही थेट आव्हान दिले आहे.
कोणत्या कलमांतर्गत गुन्हा
कलम ११६ (जनसमुदायाला गुन्हा करण्यास चिथावणी देणे, प्रवृत्त करणे)
कलम ११७ (गुन्हा करण्यास मदत करणे, अपप्रेरणा देणे)
कलम १५३ (दंगल करण्यास जनसमुदायाला चिथावणी देणे)
जामीनपात्र गुन्हे
राज यांच्यावर दाखल झालेले गुन्हे जामीनपात्र आहेत. त्यामुळे राज यांना पोलीस ठाण्यात जामीन द्यावा लागेल. या सर्व गुन्ह्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने राज यांना पोलीस नोटीस देऊन तपासामध्ये पोलीस ठाण्यात हजर राहाण्याचे आदेश देऊ शकतात.
शांतता भंग होण्याची भीती
सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे यांनी ३ मे रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यांनी नमूद केले की, राज यांचे वक्तव्य जनसमुदायाला चिथावणी मिळेल, गंभीर शांतता भंग होईल, असे होते.
सभेआधी केले होते सावध
सभेसाठी परवानगी मागणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना असे कोणतेही कृत्य झाल्यास कडक कारवाई होईल, असे समजावून सांगितले होते.