आपलं मणिपूर धुमसतंय, केंद्र सरकार असो वा तथाकथित देशभक्तांचं मौन का? - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 12:15 PM2023-07-02T12:15:06+5:302023-07-02T12:15:54+5:30
मणिपूर राज्य मागील जवळपास दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीने जळत आहे.
मुंबई : मणिपूर राज्य मागील जवळपास दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीने जळत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी दौरा करून देखील हिंसा थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अलीकडेच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरचा दौरा करून पीडितांची भेट घेतली. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून याप्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं.
राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला असून मणिपूरमधील हिंसाचार रोखण्याचे आवाहन केले आहे. "गेले २ महिने ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दश: अंसतोषाने धुमसतंय... केंद्र सरकार असो वा देशभक्तीची प्रमाणपत्र वाटणारे तथाकथित देशभक्त ह्यांनी मौन का बाळगलं आहे? दुखावलेल्या मनांना आधार द्यायला हवा अन्यथा ईशान्य भारतात देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल. मणिपूरमधील हिंसाचार रोखा तिथे शांतता प्रस्थापित करा", असे राज यांनी म्हटले.
आपलं मणिपूर धुमसतंय, आपला ईशान्य भारत खदखदतोय पण... 🇮🇳 pic.twitter.com/18wwwLovSZ
— Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2023
मणिपूरमध्ये हिंसाचाराची आग
मागील रविवारी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी शनिवारीच गृहमंत्री शाह यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत १८ पक्षांची सर्वपक्षीय बैठक घेतली होती. बैठकीत सपा आणि आरजेडीने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात आली होती.
मणिपूरमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा यासाठी मैतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर हिंसाचार सुरु झाला होता. राज्याच्या लोकसंख्येपैकी ५३ टक्के असलेला मैतेई समुदाय प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतो. तर नागा आणि कुकी सारख्या आदिवासी समुदायांची लोकसंख्या ४० टक्के आहे आणि ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.