'देश की बेटियाँ'ची फरफट होतेय, पंतप्रधानांनी लक्ष घालायला हवं; राज ठाकरे कुस्तीपटूंसाठी सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 06:24 PM2023-05-31T18:24:06+5:302023-05-31T18:24:24+5:30

देशातील नामांकित खेळाडू २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत.

MNS chief Raj Thackeray has written a letter demanding that Prime Minister Narendra Modi should pay attention to the agitation against former president of Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh | 'देश की बेटियाँ'ची फरफट होतेय, पंतप्रधानांनी लक्ष घालायला हवं; राज ठाकरे कुस्तीपटूंसाठी सरसावले

'देश की बेटियाँ'ची फरफट होतेय, पंतप्रधानांनी लक्ष घालायला हवं; राज ठाकरे कुस्तीपटूंसाठी सरसावले

googlenewsNext

देशातील नामांकित खेळाडू २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. मागील दोन-तीन दिवसांपासून या आंदोलनाला वेगळं वळण लागल्याचे दिसते. काल आंदोलक 'पदकं' हरिद्वार येथील गंगेत विसर्जित करण्यासाठी गेले होते. पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर तूर्तास हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पैलवानांच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे याप्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. 

"सन्मा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, ज्यांचा गौरव आपण 'देश की बेटियाँ' असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती", असं राज यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांची पत्राद्वारे मागणी

राज ठाकरेंनी पत्राद्वारे लिहलं, "सस्नेह जय महाराष्ट्र, आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता 'प्रधानसेवक' ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती. ज्यांचा गौरव आपण 'देश की बेटियाँ' असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही 'बाहुबला'चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे."

तसेच ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा/ विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे. म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर 'खेलो इंडिया' हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे. आपण ह्या विषयांत लक्ष घालावं आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती, असं राज ठाकरे यांनी आणखी नमूद केलं.

 

Web Title: MNS chief Raj Thackeray has written a letter demanding that Prime Minister Narendra Modi should pay attention to the agitation against former president of Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.