'राज'पुत्र सक्रिय राजकारणात?; बाळासाहेबांच्या जयंतीला अमित ठाकरेंचा होणार 'उदय'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 10:28 AM2020-01-08T10:28:09+5:302020-01-08T10:50:48+5:30
मनसेला तरुण चेहरा देण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे राज्याच्या राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार असल्याची माहिती मिळत आहे. २३ जानेवारीला होणाऱ्या मनसेच्या अधिवेशनात अमित ठाकरेंचं अधिकृत लॉन्चिंग होणार असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. मनसेला तरुण चेहरा देण्यासाठी अमित ठाकरे राजकारणात सक्रिय होतील, असं सांगितलं जात आहे.
२३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. त्याच दिवशी मनसेचं अधिवेशन होणार आहे. यामध्ये अमित ठाकरेंच्या लॉन्चिंगची घोषणा केली जाऊ शकते. याआधी अमित ठाकरेंनी काही आंदोलनांचं नेतृत्त्व केलं आहे. जवळपास दीड महिन्यापूर्वी अमित ठाकरेंनी नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या थाळीनाद मोर्चा काढला होता. याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अमित ठाकरेंनी नवी मुंबईत मोर्चाचं नेतृत्त्व केल्यानंतर ते लवकरच सक्रिय राजकारणात येतील, अशी चर्चा सुरू झाली होती.
रेल्वेच्या प्रश्नांवरदेखील अमित ठाकरेंनी अनेकदा आवाज उठवला आहे. याशिवाय आरेतील मेट्रो कारशेडचा वाद तापला असताना त्यांनी आंदोलकांची भेटदेखील घेतली होती. गेल्या काही महिन्यांपासून ते मनसेच्या शाखांमध्ये जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेटीगाठीदेखील घेत आहेत. अमित ठाकरे अनेकदा राज ठाकरेंच्या सभांना उपस्थित राहिले आहेत. मात्र ते कायम व्यासपीठासमोरील भागात दिसले आहेत. मात्र २३ जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात ते पक्षाच्या व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे.
२३ जानेवारीला होणारा मनसेचा मेळावा पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात कालच एक गुप्त भेट झाली असल्यानं मनसेच्या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीत राज्यातील सध्याची राजकीय समीकरणं आणि भविष्यातील राजकीय गणितांवर चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.