राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार?; भाजपाला घेरण्यासाठी नवी 'राजनीती'

By संदीप प्रधान | Published: July 8, 2019 04:48 PM2019-07-08T16:48:07+5:302019-07-08T16:51:07+5:30

मनसैनिकांमध्येही 'साहेबां'च्या पुढच्या आदेशाबद्दल उत्सुकता आहे.

MNS chief Raj Thackeray may boycott Maharashtra assembly elections 2019 | राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार?; भाजपाला घेरण्यासाठी नवी 'राजनीती'

राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार?; भाजपाला घेरण्यासाठी नवी 'राजनीती'

Next
ठळक मुद्देराज ठाकरे लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यापासून राजकीय पडद्यावरून गायबच होते.राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार गंभीरपणे करत असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांकडून समजली आहे.'मॅच फिक्स असेल तर नेट प्रॅक्टिस करून उपयोग काय?', असं सूचक विधान राज ठाकरे यांनी केलं.

>> संदीप प्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार पाडण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभर जाहीर सभा घेणारे, 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मोदी सरकारच्या भूमिका-धोरणं-योजनांचा समाचार घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यापासून राजकीय पडद्यावरून गायबच आहेत. त्यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, ते विधानसभेची रणनीती आखताहेत का, मनसे कुणासोबत जाईल की स्वबळावर मैदानात उतरेल, यावरून राजकीय वर्तुळात बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. मनसैनिकांमध्येही 'साहेबां'च्या पुढच्या आदेशाबद्दल उत्सुकता आहे. अशातच, राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार गंभीरपणे करत असल्याची खळबळजनक माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रातील अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून, त्यांनाही ते बहिष्काराचं आवाहन करणार असल्याचं समजतं.   

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर आज जवळपास दीड महिन्यानी राज ठाकरे 'पॉलिटिकल पीच'वर उतरल्याचं पाहायला मिळालं. पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असं निवेदन त्यांनी स्वतः दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दिलं. तब्बल १४ वर्षांनी ते दिल्लीला गेलेत. विधानसभा निवडणुकीच्या दिशेनं मनसेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणूनच त्यांच्या या भेटीकडे पाहिलं जातंय. परंतु, विधानसभा निवडणुकीकडे राज ठाकरे वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहत असल्याचं मनसेतील काही सूत्रांना वाटतंय. राज ठाकरेंच्या एका विधानातूनही आज त्याची प्रचिती आली. 

'मॅच फिक्स असेल तर नेट प्रॅक्टिस करून उपयोग काय?', असं सूचक विधान राज ठाकरे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं. विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा, त्यांचा सूर अगदीच निराशाजनक वाटला. निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहेत, पण औपचारिकता म्हणून त्यांना भेटलो, या वाक्यातून त्यांची उद्विग्नता आणि हतबलता दिसली. भाजपा सर्व निवडणुका ईव्हीएम घोटाळा करूनच जिंकत असल्याची त्यांची अगदी ठाम धारणा झाली आहे. ती मॅच फिक्सिंगच्या विधानातून जाणवली. त्यातूनही, विधानसभेची 'मॅच' न खेळण्याबाबत ते विचार करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबईत परतल्यावर पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचं राज यांनी म्हटलंय. त्यामुळे सगळ्यांचीच धडधड वाढली आहे.  



राज ठाकरेंच्या सभांना तुफान गर्दी झाली, पण मतं भाजपालाच गेली. यातून, मनसेची संघटनात्मक ताकद प्रचंड कमी झाल्याचं स्पष्ट दिसतं. अर्थकारणाचा विचार केल्यास भाजपाच्या आसपास मोठे पक्षही फिरकू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, लोकसभा निवडणुकीत जे झालं, तसाच निकाल विधानसभेलाही लागू शकतो. या पार्श्वभूमीवर, विधानसभेच्या मैदानात उतरण्यापेक्षा ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बहिष्काराची 'राजनीती' करण्याचा विचार राज यांच्या डोक्यात सुरू असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. इतकंच नव्हे तर, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह अन्य राजकीय पक्षांशी चर्चा करून त्यांनाही आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न राज करू शकतात. राजू शेट्टी यांनी अलीकडेच राज ठाकरेंची भेट घेतली. अशा नेत्यांना सोबत घेऊन राज ठाकरे आपलं इंजिन वेगळ्या मार्गाने नेऊन भाजपा-शिवसेनेला धडक देणार का, हे पाहावं लागेल. 



Web Title: MNS chief Raj Thackeray may boycott Maharashtra assembly elections 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.