...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 08:00 PM2020-01-23T20:00:14+5:302020-01-23T20:16:28+5:30
राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे आणि अमित शहांची भेट घेणार
मुंबई: राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये देशविरोधी कट शिजत आहे. याची माहिती देण्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेईन, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात म्हटलं. पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेल्या घुसखोरांना हाकलून द्या. त्यासाठी माझा मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी मराठी भाषा, हिंदुत्व, सीएए, एनआरसीसारख्या विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या देशातल्या ज्वलंत विषयांवर राज ठाकरेंनी आज भाष्य केलं. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर मुस्लिमांना देशातून बाहेर हाकलून देण्याची गरज आहे. ही भूमिका मी आधीही मांडली आहे आणि त्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी माझा केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत. याबद्दलची माहिती माझ्याकडे आहे. यासाठी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं राज यांनी सांगितलं. बांगलादेश आणि पाकिस्तानी घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून द्यावं यासाठी येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत मनसे मोर्चा काढणार आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात निघणाऱ्या मोर्च्यांना मनसे मोर्च्याने उत्तर देईल, असंदेखील राज म्हणाले.
आज राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणाच्या पहिल्याच वाक्यातून आपली भूमिका स्पष्ट केली. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो असं म्हणत राज आधी त्यांच्या भाषणांची सुरुवात करायचे. मात्र, आज राज यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात, जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो, अशी केली. राज यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच बदल दाखवून दिला. ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करायचे, अगदी तशीच राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.