प्रत्येकाला 'जागा' दाखवली; राज ठाकरेंनी मोदींना चक्क कोर्टात खेचले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 10:57 PM2019-01-08T22:57:27+5:302019-01-08T23:11:06+5:30
सीबीआयवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज ठाकरेंचे मोदींना फटकारे
मुंबई: सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना तडकाफडकी पदावरून हटवणाऱ्या मोदी सरकारला आज सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिला. आता यावरून राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून फटकारले आहे. न्यायालयानं प्रत्येकाला जागा दाखवली, असा टोला राज यांनी लगावला. मोदींनी हटवलेल्या वर्मा यांची आज न्यायालयानं सीबीआयच्या संचालकपदी फेरनियुक्ती केली. यावरून राज यांनी मोदींना समाचार घेतला.
राज ठाकरेंनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात कोर्टरूम दाखवण्यात आली आहे. त्यात एका बाजूला मोदी आरोपीच्या पिंजऱ्यात दाखवलेले आहेत. त्यांच्यासमोर सीबीआयच्या संचालक पदावरून आलोक वर्मा सूटाबूटात उभे आहेत. त्यांना न्यायमूर्ती 'या वर्माजी बसा' असं म्हणत सीबीआय संचालकांच्या खुर्चीकडे बोट दाखवत आहेत. हे चित्र पाहून मोदींना रडू कोसळलं आहे. राद यांनी या व्यंगचित्राला 'प्रत्येकाला जागा दाखवली' असं शीर्षक दिलं आहे.
सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय मोदी सरकारनं तडकाफडकी घेतला होता. मध्यरात्री हा निर्णय घेण्यात आला. मात्र हा आदेश रद्द करत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मोठा झटका दिला. याप्रकरणी आज सुनावणी झाली. यावेळी, सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटवण्याआधी निवड समितीची परवानगी घ्यायला हवी होती. ज्या पद्धतीने सीव्हीसीने आलोक वर्मा यांना हटवले, ते संविधानाच्या विरोधात आहे, असं सांगत न्यायालयानं आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द केला. आलोक वर्मा सीबीआयच्या संचालकपदी राहतील. मात्र, संचालकपदी असताना कोणतेही मोठे निर्णय ते घेऊ शकणार नाहीत. तसेच, त्यांच्याबाबतीत उच्च स्तरीय समितीनं एका आठवड्यात निर्णय घ्यावा, असंही यावेळी न्यायालयानं सांगितलं.