महाराष्ट्राचे नेते मिंधे झालेले आहेत, पैशांसाठी वेडे झालेत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर बरसले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 06:16 PM2024-01-06T18:16:16+5:302024-01-06T19:13:44+5:30

महाराष्ट्राच्या विरोधात अनेक महाराष्ट्र-द्वेष्ट्यांची मिळून अशीही एक सहकार चळवळ सुरू असल्याचा हल्लाबोलही राज ठाकरेंनी केला आहे.

mns chief raj thackeray slams state and central government in raigad program | महाराष्ट्राचे नेते मिंधे झालेले आहेत, पैशांसाठी वेडे झालेत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर बरसले!

महाराष्ट्राचे नेते मिंधे झालेले आहेत, पैशांसाठी वेडे झालेत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर बरसले!

MNS Raj Thackeray ( Marathi News ) :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज 'सहकार परिषद २०२४' या कार्यक्रमात बोलताना राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे घणाघाती टीका केली आहे. "आपल्याकडे येणारे प्रकल्प हिसकावले जातात, हजारो एकर जमिनी गिळल्या जात आहेत, मराठी माणसाला आपापसात झुंजवलं जात आहे. महाराष्ट्राच्या विरोधात अनेक महाराष्ट्र-द्वेष्ट्यांची मिळून अशीही एक सहकार चळवळ गेली ७० वर्ष सुरू आहे. पण आपले महाराष्ट्राचे नेते मिंधे झालेले आहेत, पैशांसाठी वेडे झाले आहेत.त्यांना महाराष्ट्राचं सत्व कळत नाही. त्यांना पाठीचा मणका नाही. स्वतःची मनं आणि स्वाभिमान त्यांनी गहाण टाकलेला आहे," असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला आहे.

देशात सुरू असलेल्या राजकारणावरून निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले की, "ज्या निष्ठुरपणे देशातील राजकारण सुरू आहे, ज्याप्रकारे न्यायव्यवस्था सुरु आहे. त्यानुसार उद्या ते मुंबईला हात घालायला मागे-पुढे बघणार नाहीत. महाराष्ट्राचे तुकडे करायला, विदर्भ वेगळा करायला वेळ लावणार नाहीत. हे का होतंय? कारण मराठ्यांनी सव्वाशे वर्ष या देशावर राज्य केलंय, महाराष्ट्र स्वतंत्र मताचा प्रदेश आहे. हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय," असा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे.

राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांबाबत मवाळ भूमिका घेत असल्याची चर्चा होत असताना आज मात्र त्यांनी कोणाचंही नाव न घेता जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते सत्ताधारी एनडीएविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेणार का, हे पाहावं लागेल.

मराठी माणसाला आवाहन करत काय म्हणाले राज ठाकरे?

विविध प्रकल्पांवरून संशय व्यक्त करताना राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, "माझी रायगडमधील मराठी बांधवांना हात जोडून विनंती आहे, शिवडी-न्हावाशेवा पूल पूर्ण होईल, उद्या इथे विमानतळ होईल तेव्हा रायगड जिल्ह्यातील जमिनी राखा, इथलं मराठी माणसाचं अस्तित्व जपा. नाहीतर भविष्यात पश्चातापाचा हात कपाळावर मारण्यापलीकडे काहीही उरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं आपला शत्रू समुद्रमार्गे येईल, समुद्रावर गस्त वाढवा. पण आम्ही बेसावध. महाराष्ट्रात आजपर्यंत झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी समुद्रमार्गेच आले आहेत. ३५० वर्षांपूर्वी महाराजांनी सांगूनही आमचे राज्यकर्ते त्यातून बोध घेत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आरमार उभं केलं. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजरा करायच्या पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या कोकण किनारपट्टीला राखायचं नाही... मग हिंदवी स्वराज्याकडून आपण काय प्रेरणा घेतली?" असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
 

Web Title: mns chief raj thackeray slams state and central government in raigad program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.