सरकारला शाप लागतील; मूकबधिरांना झालेल्या मारहाणीवरुन राज ठाकरे बसरले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 09:16 PM2019-02-25T21:16:30+5:302019-02-25T21:35:06+5:30
सरकारला फक्त खाबुगिरीत रस असल्याचा राज यांचा आरोप
पुणे: मूकबधिरांना झालेल्या मारहाणीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारवर बरसले आहेत. ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, अशांवर लाठीमार कसला करता?, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मूकबधिरांना शिकण्याची, स्वत:च्या पायांवर उभं राहण्याची इच्छा आहे. शिक्षक मिळावेत, यासाठी ते आंदोलन करत आहेत. मात्र सरकार त्यांच्यावर लाठीमार करत आहे. या सरकारला नक्कीच त्या मुलांचे शाप लागतील, अशा शब्दांमध्ये राज यांनी सरकारला लक्ष्य केलं. राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्या मुलांची भेटदेखील घेतली.
मूकबधिरांना पोलिसांकडून मारहाण होते, ही गोष्ट अतिशय दुर्देवी असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 'मूकबधिरांना मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले, हा प्रश्न आहे. ज्यांनी हे आदेश दिले, त्यांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा घ्यावा,' अशी मागणी राज यांनी केली. आंदोलनकर्त्या मुलांच्या मागणीत चुकीचं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'त्या मुलांना शिक्षण घ्यावंसं वाटतं आहे. त्यांना शिकायचं आहे. त्यासाठी त्यांना शिक्षक हवेत. त्यामध्ये चुकीचं काय?' असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही अधिकारी ऐकत नसतील, तर मग सरकारचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी विचारला.
मूकबधीर मुलांची भेट घेतल्यानंतर राज यांनी फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. सरकार फक्त खाबुगिरीत गुंग आहे. त्यांना या मुलांशी काहीही देणंघेणं नाही. फक्त पैशांवर निवडणुका जिंकायच्या आणि पैसा कमवायचा हेच सुरू आहे. त्यामुळे आता या सरकारला आधीच्या सरकारला दोष देण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे सरकारवर बरसले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू, असंदेखील त्यांना सांगितलं. ठिय्या दिलेल्या मुलांची सोय करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.