भाजपा कार्यकर्त्यांना पट्ट्याने फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 02:45 PM2018-07-18T14:45:56+5:302018-07-18T14:51:13+5:30
मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या थर्ड डीग्रीवरुन राज ठाकरे संतप्त
पुणेः मुंबईतील खड्ड्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मुलांना पोलिसांनी 'थर्ड डीग्री' दिल्याच्या प्रकारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पट्ट्याने फोडून काढलं तर चालेल का?, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
मुंबई, ठाण्यासह सर्वच प्रमुख शहरांमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. खड्ड्यांच्या पाण्याने आंघोळ करून, खड्ड्यांभोवती रांगोळी काढून, प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मनसैनिक प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न करताहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नवी मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली होती. या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना थर्ड डीग्री देण्यात आल्याचा दावा राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला.
मिश्रा, शर्मा नावाचे पोलीस अधिकारी आमच्या मुलांना थर्ड डीग्री देतात. खड्ड्यांसाठी आंदोलन केलं म्हणून त्यांना पट्ट्याने मारतात. समजा, उद्या तुमची सत्ता गेल्यानंतर, भाजपाच्या आंदोलक कार्यकर्त्यांना पट्ट्याने फोडून काढलं तर चालेल का?, असा राग राज ठाकरेंनी व्यक्त केला. मनसैनिकांना मारणाऱ्या पोलिसांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्याची सत्ता भंकस आहे का?
नाणार प्रकल्पाला आपण आधीच विरोध केला असल्याचं स्पष्ट करत, राज यांनी शिवसेना-भाजपा सरकारला लक्ष्य केलं. सत्तेतला एक पक्ष म्हणतो नाणार होणार आणि एक म्हणतो होणार नाही. राज्याची सत्ता भंकस आहे की मजाक? हे दोघं आपल्याला येडे बनवताहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली.
इथे रेल्वेचे अपघात होताहेत आणि हे निघालेत बुलेट ट्रेन आणि हायपरलूप आणायला?, असा टोलाही त्यांनी लगावला.