Maharashtra Politics: ‘राज’पुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार? दिले महत्त्वाचे संकेत; सांगितली ‘मन की बात’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 01:09 PM2022-10-15T13:09:59+5:302022-10-15T13:10:50+5:30
Maharashtra News: राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार का? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra Politics: राज्यात आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे नाही. राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) सक्रीय झाले आहेत. अमित ठाकरे हे राज्यव्यापी दौऱ्यावर असून, पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यातच अमित ठाकरे यांना विधानसभा निवडणूक लढवणार का, अशी विचारणा करण्यात आली. यावर महत्त्वाचे संकेत देत अमित ठाकरे यांनी मन की बात सांगितली.
राज्याच्या दौऱ्यावर असलेले अमित ठाकरे यांनी औरंगाबाद येथे काही पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी अमित ठाकरे यांनी सूचक विधान केले. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार का? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
‘राज’पुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याबाबत यावेळी प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही महाराष्ट्रभर फिरून नव्याने संघटन बांधण्यासाठी प्रयत्न करत आहात. भविष्यात निवडणूक लढवण्याबाबत तुमचा काय विचार आहे, असा प्रश्न अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, पक्षाला जर गरज वाटली तर मी निवडणूकही लढवायला तयार आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले असून, दौरे, सभा यांचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे कुटुंबात आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात वरळी मतदारसंघातून उतरले होते. या निवडणुकीत आदित्य यांनी मोठ्या मताधिक्याने विजयही मिळवला होता. त्यानंतर आता अमित ठाकरे यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"