तीन तारखा, तीन कार्यक्रम; राज ठाकरेंचा संपूर्ण प्लान ठरला; पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:33 PM2022-04-19T12:33:07+5:302022-04-19T12:35:58+5:30
राज ठाकरेंचं 'जय श्रीराम!' शिवतीर्थावरील बैठक संपली; तीन तारखांसह संपूर्ण प्लान ठरला
मुंबई: मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थावर बैठक घेतली. या बैठकीत राज यांनी जय श्रीरामचा नारा दिला. आक्रमक हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल सुरू केलेल्या राज यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. या बैठकीत ३ महत्त्वाच्या तारखांवर चर्चा झाली. तयारीला लागण्याचे आदेश राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
१ मे रोजी राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेवरून राजकारण तापलं आहे. राज यांची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळेंनी दिला आहे. प्रशासनानं परवानगी दिली तरीही सभा उधळून लावू, असा आक्रमक पवित्रा कांबळेंनी घेतला आहे. औरंगाबादमध्ये जोरदार सभा घ्यायची आहे. त्यासाठी तयारीला लागा, असे आदेश राज यांनी आज झालेल्या बैठकीत दिले.
औरंगाबादच्या सभेला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील अशी तयारी करा. त्यादृष्टीनं नियोजन करा. सभेला परवानगी नाकारली जाईल, अशी कोणतीही कृती करू नका. जे काही उत्तरं द्यायचंय ते मी सभेच्या माध्यमातून देईन, अशी सूचना राज यांनी केली.
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे राज्यभरात महाआरत्यांचं आयोजन करण्याचे आदेश राज यांनी दिले. राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
५ जूनला राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. त्यासाठी स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली जाणार आहे. त्याची जबाबदारी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंकडे सोपवण्यात आली आहे. यासाठी १० ते १२ ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. रेल्वे राज्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार आहे. याशिवाय राज यांच्या सुरक्षेसाठी गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिण्यात येणार आहे.