Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंची २ भाकितं खरी ठरणार? संजय राऊत अटकेत; शरद पवारांबद्दल म्हणाले होते...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 01:47 PM2022-08-01T13:47:27+5:302022-08-01T13:49:09+5:30
Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंनी आपल्या जाहीर सभेत संजय राऊत आणि शरद पवारांसंदर्भात केलेल्या विधानांची जोरदार चर्चा सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Political Crisis: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा काही महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यांची दोन भाकिते खरी ठरणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे सांगितले जात आहे.
राज ठाकरे दिवा शहरात पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला आले होते. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना सेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली होती. आमचं राजकारण मिमिक्रीवर चालत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर बोलताना, आता त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, असे प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी दिले होते. यानंतर जाहीर सभेत टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते की, आता शरद पवारसाहेब संजय राऊतांवर खूश आहेत. पण, कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही. संजय राऊत यांच्या अटकेनंतर राज यांच्या दोन्ही विधानांची चर्चा आहे.
राज ठाकरेंचा 'तो' सल्ला कदाचित राऊतांना उपयोगी येईलच
दुसरीकडे, मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत, राज साहेबांनी संजय राऊत यांना एकट्यात बोलण्याची सवय लावावी, असा सल्ला दिला होता, आज तो सल्ला कदाचित राऊतांना जेलमध्ये उपयोगी येईलच....!!! असा टोला लगावला. तसेच याआधी रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणून उपदेश देणार्यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे, असे म्हणत शालिनी ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती.
दरम्यान, भाजपने संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा, असे म्हणत निशाणा साधला आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. तसेच सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता आणि अटक होताना भगवा गळ्यात कशाला?, अशी विचारणाही केली आहे.