अन्यथा त्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना इशारावजा पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 02:01 PM2020-07-28T14:01:03+5:302020-07-28T14:17:08+5:30
मनसे प्रमुख राज ठाकरेंची आक्रमक भूमिका; राज्य सरकारला सूचक इशारा
मुंबई: लॉकडाऊनच्या काळात राज्यातल्या जनतेला वाढीव वीज बिलाचा सामना करावा लागत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असताना वीज बिलामुळे अनेकांचं कंबरडं मोडलं आहे. या प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी वीज कंपन्यांना सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खासगी वीज कंपन्यांनादेखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खासगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, अशी आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सरकारी आणि खासगी वीज कंपन्यांनी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलं पाठवली आहेत. राज ठाकरेंनी याच संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. वीज कंपन्यांनी पाठवलेली बिलं म्हणजे ग्राहकांची लूट आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाची शाश्वती नसताना वाढीव वीज बिल पाठवणं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करण्यासारखं असल्याचं राज यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
अव्वाच्यासवा वीज बील आकारणीला तात्काळ चाप बसायलाच हवा. #वीजआकारणी#महावितरण#टाळेबंदी#कोरोनामहासाथ#MahaVitaran#electricitybill#Lockdown#CoronaCrisis@CMOMaharashtrapic.twitter.com/IFnxkBOZLw
— Raj Thackeray (@RajThackeray) July 28, 2020
कोरोनाची परिस्थिती अभूतपूर्व होती आणि त्यामुळे राज्यातील जनता, राजकीय पक्ष एकदिलानं सरकारच्या पाठिशी ठाम उभे राहिले आणि भविष्यातदेखील राहतील. पण या अशा विषयांत जनता आणि मनसे गप्प बसेल अशी चुकीची समजूत सरकारनं करून घेऊ नये, असा सूचक इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी या विषयात तातडीनं लक्ष घालून वीजबिलात तात्काळ सूट द्यावी तसंच ही सूट कोणत्याही प्रकारानं भविष्यात वसूल करायचा प्रयत्न करू नये. राज्य सरकारनं आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खासगी वीज कंपन्यांनादेखील कडक शब्दांत समज द्यायला हवी. अन्यथा या खासगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, अशी आक्रमक भूमिका राज यांनी घेतली आहे. विषय संवेदनशील आहे आणि सरकारदेखील संवेदनशीलपणे हा विषय हाताळेल याची खात्री असल्याचा विश्वास राज यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केला आहे.