...तरच हे शक्य आहे; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं मराठी माणसांना साद घालणारं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 10:35 AM2023-02-27T10:35:05+5:302023-02-27T10:35:50+5:30

आजच्या दिवशी आपल्या लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभे राहावं लागणार आहे. हे भान सोडून चालणार नाही असं राज ठाकरे म्हणाले.

MNS chief Raj Thackeray's letter to Marathi people on the occasion of Marathi Raj Bhasha Day | ...तरच हे शक्य आहे; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं मराठी माणसांना साद घालणारं पत्र

...तरच हे शक्य आहे; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं मराठी माणसांना साद घालणारं पत्र

googlenewsNext

मुंबई - २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी राजभाषा दिन..आजचा दिवस राज्यात ठिकठिकाणी साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनाच्या लोकांना शुभेच्छा देत लोकांना पत्र लिहिले आहे. मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं अशा शुभेच्छा राज यांनी पत्रातून दिल्या आहेत. 

राज ठाकरेंनी लिहिलेले पत्र वाचा जसच्या तसं... 
 

सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा

कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाला अभिवादन म्हणून तेव्हांच्या सरकारने कुसुमाग्रज जयंती २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो सार्वजनिक स्वरुपात अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पहिला पक्ष पण आमचाच. हे सगळे सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरारीने पुढे आलेला नाही आणि सध्या जी एकूणच राजकीय दंगल सुरू आहे त्यात कुणी येईल अशी शक्यता वाटत नाही. 

असो, त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभे राहावं लागणार आहे. हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी असावी. प्रशासनात मराठी असावी इथपासून ते अगदी दूरसंचार माध्यमांमध्ये. दूरदर्शनवरील समालोचनात, अभिजात भाषेच्या दर्जासाठीही आम्ही संघर्ष केला आणि पुढे देखील करू. पण त्यासाठी आमच्या संघर्षाला तुमची साथ हवी तरच हे शक्य आहे. मला माहिती आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात पण या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीचीही नितांत गरज आहे. आपण मराठी एकत्र असू तर सर्वत्र मराठी करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही. 

मी माझ्या विकास आराखड्यात म्हणले आहे तसं मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपले स्वप्न असायला हवं हे स्वप्न वास्तवात यावं ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा..!

आपले नम्र
राज ठाकरे

Web Title: MNS chief Raj Thackeray's letter to Marathi people on the occasion of Marathi Raj Bhasha Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.