मनसे प्रमुख राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा; १७ सप्टेंबरपासून विदर्भातून श्रीगणेशा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 03:21 PM2022-09-06T15:21:15+5:302022-09-06T15:21:49+5:30
विदर्भासह, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा राज ठाकरेंचा दौरा होणार आहे.
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १७ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात विदर्भापासून होणार आहे. १७ सप्टेंबरपासून २ दिवसीय नागपूर दौरा करतील. त्यानंतर चंद्रपूर, अमरावतीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. राज ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त विदर्भात मनसे पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न होणार आहे.
राज ठाकरेंच्या या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे नागपूरला जाणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर राज ठाकरेंचा पहिलाच दौरा आहे. राज ठाकरे यांच्यावर अलीकडेच शस्त्रक्रिया पार पडली. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा पक्षसंघटनेत सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
विदर्भासह, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा राज ठाकरेंचा दौरा होणार आहे. राज्यातील राजकीय समीकरणं पाहता ही पक्षवाढीसाठी संधी आहे असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना म्हटलं होते. राज्यात शिवसेनेत २ गट पडले आहेत. त्यात शिवसेनेचे ४० आमदार, १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद कमकुवत झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या परिस्थितीचा फायदा घेत राज ठाकरे सक्रीय झाले आहेत.
सगळे नेते राज ठाकरेंच्या भेटीसाठी का जातात..?
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला गेले, तेव्हा त्यांच्या मातोश्रींनी फडणवीस यांचे औक्षण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपतीच्या निमित्ताने राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींना नमस्कार करून आले. भाजपचे मुंबईचे माजी अध्यक्ष आणि कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा मंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांना भेटून आले. राज यांना गेल्या काही महिन्यांत भेटीसाठी कोणते नेते गेले याची यादी केली तर तीच भली मोठी होईल. एक नगरसेवक आणि एक आमदार असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज यांच्या भेटीला गेले काही दिवस भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे नेते का जात आहेत..? हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलेला आहे.
राज ठाकरे यांचे काही प्लस पॉईंट आहेत, जे अन्य कोणत्याही नेत्यांकडे नाहीत. उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची आणि कठोर टीका करण्याची क्षमता फक्त राज ठाकरे यांच्यामध्ये आहे. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरे यांनी करावे असे सातत्याने सांगणारा एक मोठा वर्ग आहे. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे. एकनाथ शिंदे आणि भाजपला सडेतोड उत्तर द्यावे, असा आवाज आता हळूहळू पुन्हा नव्याने ऐकायला येत आहे. तशी शक्यता अत्यंत धूसर आहे, तरीही असे झाले तर मुंबई महापालिका निवडणुकीत त्याचे मोठे नुकसान शिंदे गटाला आणि भाजपला होऊ शकते. म्हणून उद्धव आणि राज यांनी कोणत्याही परिस्थितीत एकत्र येऊ नये ही एक छोटी शक्यता यामागे आहे. राज आणि उद्धव यांनी एकत्र न येता, पडद्याआड जागा वाटपात तडजोडी करू नयेत, हा हेतू आता उघडपणे बोलला जात आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुंबईवर ठाकरे या नावाचे असणारे गारुड, असे एका रात्रीतून कमी होणारे नाही. त्यामुळे एक तरी ठाकरे आपल्यासोबत असलाच पाहिजे, या हेतूने सध्या राजकीय नेत्यांच्या ‘शिवतीर्था’वर चकरा वाढल्या आहेत.