Raj Thackeray: 'हिंदूजननायक' उपाधीवर राज ठाकरेंनी हातच जोडले, जरा चिडूनच म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 12:36 PM2020-02-14T12:36:16+5:302020-02-14T12:40:39+5:30
हिंदूहृदयसम्राट पाठोपाठ 'हिंदूजननायक' उपाधीलाही राज ठाकरेंचा आक्षेप
औरंगाबाद: मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याच्या निमित्तानं संपूर्ण शहरात त्यांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यावर राज यांच्या नावासमोर 'हिंदूजननायक' असा उल्लेख आहे. या उपाधीबद्दल प्रश्न विचारताच राज ठाकरे काहीसे संतापलेले दिसले. मी तसं काही मानत नाही, हे स्पष्ट करताना त्यांनी हिंदूहृदयसम्राट उपाधी लावण्यात आली, त्यावेळी दिलेल्या सूचनेचा संदर्भ दिला. राज यांनी आज सकाळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
हिंदूजननायक राज ठाकरे यांचं औरंगाबादमध्ये हार्दिक स्वागत, असा मजकूर असलेले बॅनर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात लावण्यात आले आहेत. त्याबद्दल राज यांना प्रश्न विचारताच त्यांनी थेट हात जोडले. 'मी असं काही मानत नाही. याआधी माझ्या नावापुढे हिंदूहृदयसम्राटअशी उपाधी लावण्यात आली होती. त्यावेळीही मी असं काही करू नये अशी ताकीद दिली होती,' याची आठवण राज यांनी करुन दिली. माझ्या परवाच्या मोर्चावेळी एका चॅनलनेच हिंदू जननायक लिहिलं होतं. त्यांना विचारून बघा, असं राज ठाकरे पुढे म्हणाले.
पत्रकारांशी संवाद साधताना राज यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याबद्दलही भाष्य केलं. मी फक्त झेंडा बदललाय, अजेंडा नाही. माझी भूमिका बदललेली नाही, असं मनसेप्रमुख राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास मी मराठी म्हणून अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला हात लावल्यास हिंदू म्हणून अंगावर जाईन, या भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी केला. सध्या शहरात लावण्यात आलेल्या मनसेच्या पोस्टर्सवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. त्यावर नाव बदलल्यास हरकत काय, असा प्रश्न विचारत राज यांनी नामांतराचा मुद्दा उपस्थित केला. चांगले बदल व्हायला हवेत, असं राज यांनी या विषयावर भाष्य करताना म्हटलं.