रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 10:00 AM2024-04-29T10:00:52+5:302024-04-29T10:01:39+5:30
Loksabha Election - रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
रत्नागिरी - Sandeep Deshpande on Uddhav Thackeray ( Marathi News ) बिनशर्त पाठिंबा म्हणजे काय हे ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचं सतत ओरबाडून खाल्लं ते त्यांना समजणार नाही. २०१२ च्या निवडणुकीत ठाण्यात मनसेचे ७ नगरसेवक आले होते, राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा महापौर होणार असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि इतर आमदार राज ठाकरेंना भेटले, तिथली परिस्थिती सांगितली. त्यावेळी राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला. ही माझ्या नेत्याची ताकद आहे. कुठलाही स्वार्थ न बाळगता काम कसं करायचं हे राज ठाकरेंकडून शिकलं पाहिजे. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे कोण असतील तर ते उद्धव ठाकरे आहेत अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे.
रत्नागिरी येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसेचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी संदीप देशपांडे म्हणाले की, २०१४ ला शिवसेना-भाजपाची युती तुटली. तेव्हा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करून आपण एकत्र येऊया म्हटलं, तेव्हा राजसाहेबांनी उमेदवारांना एबी फॉर्म देणे थांबवले. मनसे भाजपासोबत जाऊ नये म्हणून हे कटकारस्थान केले. त्यानंतर मनसेकडून सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा या लोकांनी फोन बंद केले. हीच गोष्ट २०१७ च्या महापालिका निवडणुकीवेळी केली. तेव्हा मी आणि संतोष धुरी यांना निरोप पाठवला, मराठी माणसांसाठी आपण एकत्र आले पाहिजे. त्यांची एकच रणनीती होती मनसे कुठल्याही परिस्थितीत भाजपासोबत जाऊ नये. अमित ठाकरे गंभीर आजारात होते, तेव्हा हा व्यक्ती मनसेचे नगरसेवक कटकारस्थान करून फोडण्यात गुंग होता. त्यांना ५-५ कोटी रुपये देऊन फोडले. उद्धव ठाकरे राजकारणी म्हणून तुम्ही नीच आहातच पण भाऊ म्हणूनही तुम्ही नीच आहात हे या सर्व प्रसंगातून दिसते असंही त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय उबाठाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, प्रत्येक जाहीरनाम्यात बेळगाव सीमाप्रश्न नेहमी असतो, परंतु या जाहीरनाम्यात बेळगावच्या सीमाप्रश्नाचा उल्लेख नाही कारण तिथे कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे, तिथे काँग्रेसला दुखवायचे कसे या स्वार्थातून सीमाप्रश्नाचा उल्लेख टाळला. मुंबईत काही दिवसांपूर्वी धारावी प्रकल्पाविरोधात उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढला. अदानींना हा प्रकल्प द्यायचा नाही, धारावीचा विकास होऊ द्यायचा नाही असे मुद्दे काढले. मात्र मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील एका प्री वेडिंगमध्ये उद्धव ठाकरे आणि गौतम अदानींची भेट घेतली. त्यानंतर धारावीबद्दल वाच्यता नाही. इतकेच नाही तर जाहीरनाम्यात धारावी प्रकल्पाचा उल्लेखही नाही. मग अदानींसोबत किती कोटींची सेटलमेंट तुम्ही केली? हे महाराष्ट्रातील जनतेला, कोकणच्या जनतेला तुम्हाला सांगावे लागेल अशी घणाघाती टीकाही संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.