मनसेचे ‘इंजिन’ लागले धक्क्याला!

By admin | Published: November 3, 2015 02:34 AM2015-11-03T02:34:53+5:302015-11-03T02:34:53+5:30

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महापालिका निवडणुकीत दारुण पराभव करून, मतदारांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात, मनसेचे इंजिन जणू कायमचे धक्क्याला लावले.

MNS 'engine' shocks! | मनसेचे ‘इंजिन’ लागले धक्क्याला!

मनसेचे ‘इंजिन’ लागले धक्क्याला!

Next

- गौरीशंकर घाळे (विश्लेषण)

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महापालिका निवडणुकीत दारुण पराभव करून, मतदारांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात, मनसेचे इंजिन जणू कायमचे धक्क्याला लावले.
कल्याण-डोंबिवलीत मागील निवडणुकीत मनसेला २७ जागांवर विजय मिळाला होता. या वेळी केवळ ९ जागाच मनसेला राखता आल्या. प्रभागरचना बदलल्याने फटका बसला, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. मात्र, २७ नगरसेवकांचे काम इतके मर्यादित होते की, फेररचनेनंतर त्यांच्या तोंडाला अक्षरश: फेस आला. शिवाय, कुंभमेळ्याच्या निमित्ताने शासनाने नाशकात केलेल्या कामाची टेप त्यांनी स्वत:च्या नावाने जोरदार वाजविली, पण मतदारांनी त्यांचा हा बनाव पुरता उघडा पाडला. फक्त भाषणबाजीवर निवडणुका जिंकता येत नाहीत. पक्ष नेतृत्वाची विश्वासार्हता संपली की नेमके काय होते, त्याचाच प्रत्यय या निकालांनी आला. लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिकेत मनसेचा
सारा प्रचार केवळ राज ठाकरेंच्या मोठ्या सभा व भाषणांभोवतीच घुटमळला. त्यातही ‘संपूर्ण सत्ता द्या, मग बघा कसा बदल घडवितो, सगळ्यांना सुतासारखा सरळ करतो,’ या शाब्दिक फटाक्यांपुढे राज ठाकरेंकडेही काही नव्हते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे केवळ आराखडा मांडतात.
खरेतर या आराखड्यातील अनेक कामे आमदार, नगरसेवकांच्या निधीतूनही करता आली असती.
विरोधी बाकांवर बसणाऱ्यांनाही निधी मिळतो
आणि त्यातून किमान स्वत:च्या मतदारसंघात,
प्रभागात विकासकामे करतात आली असती.
याकडे मनसे नेत्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले
असले, तरी मतदारांनी मात्र याची गंभीर नोंद घेत मनसेला चपराक लगावली, पण आपल्याच ‘कोषा’त वावरणाऱ्या बेफिकीर मनसे नेतृत्वाला त्याची तमाच नाही. आता मैदानात उतरून घाम गाळल्याशिवाय, मुंबई-नाशकात मनसेचे इंजिन धावण्याची सुतराम शक्यता नाही,
इतके मात्र कल्याण-डोंबिवलीने ठळकपणे अधोरेखित केले आहे.

Web Title: MNS 'engine' shocks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.