Gajanan Kale : "नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय"; मनसेची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 10:12 AM2022-07-30T10:12:14+5:302022-07-30T10:24:40+5:30
MNS Gajanan Kale Slams Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या विधानावरून विरोधकांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर घणाघात केला आहे. यावरून मनसेने देखील जोरदार टीका केली आहे.
मुंबई - ठाणे, मुंबई या शहरातून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं तेदेखील म्हणता येणार नाही असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे राज्यपालांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यपालांच्या विधानावरून विरोधकांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर घणाघात केला आहे. यावरून मनसेने देखील जोरदार टीका केली आहे. "नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय" असं म्हणत मनसेने बोचरी टीका केली आहे.
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत काही ट्विटस केले आहेत. "पुरे आता... यांनी आता घरी बसावं... मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये... नावात भगतसिंग इतकेच यांचं कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय यांचा..." असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच संतापजनक आणि निषेध हे दोन हॅशटॅग देखील वापरले आहेत.
पुरे आता ...
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) July 30, 2022
यांनी आता घरी बसावं ...
मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये ...
नावात भगतसिंग इतकेच यांच कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय यांचा ...#संतापजनक#निषेधpic.twitter.com/wGredZLmVJ
"मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी, महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. मराठी, महाराष्ट्राची सभ्यता, संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान, मरातब गेला चुलीत. ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका" असं देखील गजानन काळे यांनी म्हटलं आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलंय की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा अशी मागणी त्यांनी केली आहे.
मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी,महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य.
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) July 30, 2022
हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे.
हे खपवून घेतलं जाणार नाही.
मराठी,महाराष्ट्राची सभ्यता,संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान,मरातब गेला चुलीत.
ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका
काय म्हणाले राज्यपाल?
भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असं राज्यपालांनी सांगितलं. मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. राजस्थानी मारवाडी समाजानं व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालयं, इस्पितळं बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तिथं तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो, असं राज्यपालांनी म्हटलं.