"कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो"; मनसेचा संजय राऊतांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 02:56 PM2022-06-25T14:56:03+5:302022-06-25T14:57:10+5:30
MNS Gajanan Kale Slams Shivsena Sanjay Raut : मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
राज्यात शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटून वेगळा झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपा नेत्यांकडूनही दिल्लीत सध्याच्या परिस्थितीवर खलबतं सुरू आहेत. त्यामुळे राज्यात सत्तापालट पाहायला मिळणार की महाविकास आघाडीचच सरकार कायम राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं आहे. दोन्ही बाजूंनी दावे अन् प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद आता न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे पक्षाला भगदाड पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे देखील पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागले आहेत. याच दरम्यान मनसेनेशिवसेना नेते संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.
"कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो" असं म्हणत मनसेने जोरदार निशाणा साधला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "वडिलांनी दवाखाना थाटून दिला तरी डॅाक्टरला स्वतः अभ्यास करुन पेशंटची नस ओळखतां आली पाहिजे… दररोज राऊंड घेतले पाहिजे… कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो… एक ना एक दिवस पेशंट शेजारच्या दवाखान्यात जाणारच…!" असं म्हणत गजानन काळे यांनी हल्लाबोल केला आहे.
वडिलांनी दवाखाना थाटून दिला तरी डॅाक्टरला स्वतः अभ्यास करुन पेशंटची नस ओळखतां आली पाहिजे … दररोज राऊंड घेतले पाहिजे … कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो … एक ना एक दिवस पेशंट शेजारच्या दवाखान्यात जाणारच…!#अराजकीय
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 25, 2022
सौजन्य - #WhatsApp
गजानन काळे यांनी याआधी देखील शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. "शिवसेनेच्या बैठकीत ५५ आमदारांपैकी फक्त १८ विधानसभा आमदार उपस्थित... तरी पुढील २५ वर्ष मोठे नवाबच मुख्यमंत्री असणार विश्वप्रवक्ते यांचा दावा... मनात राम न ठेवता फक्त नौटंकी म्हणून अयोध्येला जाऊन आलात की हे असं होतं... नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार..." असं काळे यांनी याआधी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
"सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार, चालू द्या... तुमचाही हिशोब होईलच!"
"सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार आहे. चालू द्या... तुमचाही हिशोब होईलच" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. तसेच "अहंकार, माजाच्या अतिरेकाने ज्यांना सत्ता सांभाळता आली नाही त्यांनी किमान स्वतःला सांभाळावं" असा टोला देखील लगावला आहे. भातखळकर यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये "अहंकार आणि माजाच्या अतिरेकाने ज्यांना सत्ता सांभाळता आली नाही त्यांनी आता किमान स्वतःला सांभाळावं. भाजपा नेत्यांना शहाणपणाचे सल्ले देण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये" असं म्हटलं आहे.