मुंबई: घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूलाच्या वादात आता मनसेची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 06:11 PM2021-06-14T18:11:01+5:302021-06-14T18:11:49+5:30
घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूलाच्या नामकरणावरून भाजपा खासदार मनोज कोटक व शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यात कलगीतुरा रंगला असताना या वादात आता मनसेने उडी घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई:मुंबई शहरात अत्यंत दाटवस्ती असलेल्या मानखुर्द परिसरातून पूर्व द्रुतगती मार्ग आणि मुंबई पुणे हायवे यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या रस्त्यामुळे या परिसरातील वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे.
घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील पूर्व मुक्त मार्गाजवळून सुरु होणाऱ्या मोठ्या उड्डाणपूलाच्या नामकरणावरून भाजपा खासदार मनोज कोटक व शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यात कलगीतुरा रंगला असताना या वादात आता मनसेने उडी घेतली आहे.मनसेचे घाटकोपर पश्चिम येथील विभागअध्यक्ष गणेश चुक्कल यांनी सदर उड्डाणपुलाला ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ असं नामकरण करून धनगर समाजाचा मान आणि सन्मान राखावा ही विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.
सदर पूलाला "छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल" असे करण्याची खासदार मनोज कोटक यांनी महापालिकेतील स्थापत्य समिती उपनगरे अध्यक्ष यांजकडे लेखी पत्राद्वारे दि.9 डिसेंबर 2020 रोजी मागणी केली होती. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी या उड्डाणपुलाला 'सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज मोहिनुद्दीन सुफी चिश्ती- अजमेरी' यांचे नाव देण्याची मागणी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे दि.10 जून 2021 रोजी केली आहे. या संदर्भात लोकमत ऑनलाईनवर काल वृत्त प्रसिद्ध झाले होते. लोकमतचे वृत्त सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात व्हायरल झाले , तर खासदार मनोज कोटक यांनी सुद्धा 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेतली होती.
गणेश चुक्कल यांनी मुख्यमंत्र्याना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, मानखुर्द-शिवाजीनगर आणि गोवंडी या भागातून हा उड्डाणपूल जात आहे. या परिसरात धनगर समाज बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचसोबत धनगर समाजाचे दैवत असलेली बिरोबा आणि मायक्का देवी मंदिर याच ठिकाणी आहे. त्यामुळे सदर उड्डाणपुलाला ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ असं नामकरण करून धनगर समाजाचा मान आणि सन्मान राखावा अशी विनंती त्यांनी शेवटी केली आहे.