अपघातग्रस्त मुलासाठी मनसे सरसावली; रातोरात कार्यकर्त्यांनी जमवले १४ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 09:48 AM2022-01-13T09:48:28+5:302022-01-13T09:48:50+5:30

हॉस्पिटलचा १३ लाखाचा खर्च कसा भागवणार या चिंतेत असणाऱ्या या कुटुंबाच्या मदतीला पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली.

MNS Help injured child family; Party Workers collected Rs 14 lakh overnight | अपघातग्रस्त मुलासाठी मनसे सरसावली; रातोरात कार्यकर्त्यांनी जमवले १४ लाख रुपये

अपघातग्रस्त मुलासाठी मनसे सरसावली; रातोरात कार्यकर्त्यांनी जमवले १४ लाख रुपये

googlenewsNext

पुणे – अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणं यापेक्षा मोठं पुण्य नाही असं म्हटलं जातं. पुण्यात सध्या याची प्रचिती पाहायला मिळते. हडपसर येथील १२ वर्षीय मुलगा अपघातग्रस्त झाला होता. त्याच्या ऑपरेशनसाठी १३ लाखांचा खर्च अपेक्षित होता. घरची हालाखीची परिस्थिती आणि मुलगा जीवन मृत्यूशी लढा देतोय अशी हतबल परिस्थिती मुलाच्या घरच्यांवर आली. रस्त्याने जाताना अनपेक्षितपणे जो अपघात घडला त्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरलं.

हॉस्पिटलचा १३ लाखाचा खर्च कसा भागवणार या चिंतेत असणाऱ्या या कुटुंबाच्या मदतीला पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली. पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्याकडे एका मित्राकडून ही बातमी पोहचली. तेव्हा तात्काळ त्यांनी पुणे मनसे केबल सेनेच्या अध्यक्षांना या मुलाला मदत करण्यासाठी फोन केला. मनसे केबल सेनेने आपल्या परीनं १ लाख ६८ हजार ५०० रुपये जमा करत मुलाच्या कुटुंबीयांना दिली. पण ही मदत पुरेसी नव्हती. तरीही आमच्याकडून आणखी मदत करु असं आश्वासन वसंत मोरे यांनी कुटुंबीयांना दिले.

त्यानंतर वसंत मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवरुन संबंधित मुलाची माहिती आणि फोटो टाकून कुटुंबीयांना मदत करण्याचं आवाहन केले. या पोस्टमध्ये वसंत मोरे यांनी अपघातग्रस्त मुलाच्या वडिलांचा फोन नंबर देत त्यावर जमेल तेवढी मदत करण्याची विनंती कार्यकर्त्यांना केली. आश्चर्य म्हणजे रात्री उशीरा टाकलेल्या या पोस्टनंतर तात्काळ कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. हजारो मनसे कार्यकर्त्यांनी मदतीचा वाटा उचलत रातोरात अपघातग्रस्त मुलाच्या वडिलांच्या खात्यावर तब्बल १४ लाख २ हजार ९१२ रुपये जमा केले. मनसेनं घेतलेला पुढाकार आणि वसंत मोरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद पाहता वडिलांच्या खात्यावर मदतीचा महापूर आला. संकटकाळात कुटुंबीयांच्या मदतीला मनसे धावून आली. त्याबद्दल वडिलांनी आभार मानत त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील हडपसर येथील बी. टी कवडे रोडवर १२ वर्षीय चेतन महेश गाढवे हा विद्यार्थी दस्तुर विद्यालयात ६ वीत शिकतो. २८ डिसेंबरला चेतन घरी परतत असताना एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर रॉड खाली पडला तो थेट चेतनच्या डोक्याला लागला. चेतनला उपचारासाठी हडपसरच्या नोबेल हॉस्पिटलला हलवण्यात आले. त्याठिकाणी चेतनची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचे होते. त्याच्या उपचारासाठी १३ लाखांची आवश्यकता होती. आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबीयांनी मदतीसाठी अनेकांकडे हातपाय पसरले. तेव्हा मनसे तातडीने या कुटुंबीयांच्या मदतीला धावली.  

Web Title: MNS Help injured child family; Party Workers collected Rs 14 lakh overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे