विधानसभा निवडणुकीत मनसेचा स्वबळाचा नारा?; राज्यात 'इतक्या' जागा लढवण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 01:53 PM2024-07-23T13:53:12+5:302024-07-23T13:54:17+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून शिवतीर्थ निवासस्थानी बैठकांचा सिलसिला सुरू आहे. 

MNS is likely to contest the assembly elections on its own, it will field 200-220 candidates in the state | विधानसभा निवडणुकीत मनसेचा स्वबळाचा नारा?; राज्यात 'इतक्या' जागा लढवण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीत मनसेचा स्वबळाचा नारा?; राज्यात 'इतक्या' जागा लढवण्याची शक्यता

मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात मनसेनेही कंबर कसली आहे. विधानसभानिहाय मनसेने निरिक्षक नेमले होते. त्या निरिक्षकांकडून मतदारसंघाचा आढावा अहवाल राज ठाकरेंना सुपूर्द करण्यात आला आहे. राज ठाकरेंकडून नेते, पदाधिकाऱ्यांच्या मॅरोथॉन बैठकाही सुरू आहेत. त्यात विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा दिला जात आहे. 

याबाबत मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर म्हणाले की, मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जी बजबजपुरी झालीय त्यापासून आमचा पक्ष दूर आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही पुढे जातोय. विधानसभा निहाय आढावा घेतला जात आहोत. विधानसभा निवडणुका मनसे स्वबळावर लढवण्याची तयारी आहे. मनसेला राज्यात आशादायी चित्र आहे अशी चर्चा बैठकीत झाली आहे. २८८ मतदारसंघाचा आढावा राज ठाकरे घेत आहेत. सगळीकडे उमेदवार उभे करण्याची तयारी आहे पण २०० ते २२० जागांवर मनसेचे उमेदवार उतरवण्याची व्यूहरचना पक्षीय स्तरावर सुरू आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच राज ठाकरे सातत्याने मॅरोथॉन बैठका सुरू आहेत. नेते, पदाधिकारी यांच्यासोबत आज बैठक झाली. येत्या २५ जुलैला जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांचा मेळावा रंगशारदा येथे होणार आहे. त्यानंतर मनसेच्या अंगीकृत संघटनांच्या बैठका घेतल्या जातील. जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करतील. या दौऱ्याची आम्ही सर्वजण तयारी करतोय असं वैभव खेडेकर यांनी म्हटलं.

दरम्यान, महाराष्ट्रातलं सरकार एक कंपनी आहे. या कंपनीत ३ भागीदार आहेत. भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या भागीदार कंपनीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवीन पार्टनर होऊ इच्छित नाही. त्यामुळे आमची वाटचाल स्वतंत्रपणे असेल असंही मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी स्पष्ट सांगितले. 

लोकसभेत दिला होता बिनशर्त पाठिंबा

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा पाठिंबा देत असल्याचं मनसेनं जाहीर केले होते. यावरून मनसेवर बरीच टीका झाली. राज्यात महायुतीला अनपेक्षित यश न मिळाल्यानं आता विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्याचं काम प्रत्येक पक्षाकडून सुरू आहे. 

Web Title: MNS is likely to contest the assembly elections on its own, it will field 200-220 candidates in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.