“राज ठाकरेंवरील टीका सहन केली जाणार नाही, ही धमकी समजा नाहीतर खुले आव्हान”; मनसेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 04:00 PM2024-04-22T16:00:49+5:302024-04-22T16:02:54+5:30
MNS Warns To Thackeray Group: तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत एवढे लक्षात असू दे, असा इशारा मनसेने दिला आहे.
MNS Warns To Thackeray Group: राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर आता मनसेमहायुतीसोबत प्रचार, बैठका यांवर भर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे कुठे प्रचारसभा घेणार, मनसैनिक महायुतीच्या प्रचारात कसे सहभागी होणार, याची रणनीती आखली जात आहे. अशातच ठाकरे गटाने केलेल्या टीकेवरून आता मनसेने थेट शब्दांत इशारा दिला आहे.
राज ठाकरे म्हणजे फूस झालेली लवंगी फटाके आहेत. त्यामुळे कोकणात काहीही फरक पडणार नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली होती. या टीकेला मनसेकडून जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत राऊतांसह ठाकरे गटाला इशारा दिला असून, राज ठाकरे यांच्यावरील टीका सहन केली जाणार नाही, असे म्हटले आहे.
ही धमकी समजा नाहीतर खुले आव्हान...
अमेय खोपकर एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतात की, राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही. जनतेच्या कल्याणाचे कोणतेही काम न करणारे खासदार राऊत असोत किंवा रडत राऊत असोत, तुम्ही आमच्या राज ठाकरेंवर खालच्या पातळीची टीका करणार असाल तर आम्ही मनसैनिक ते खपवून घेणार नाही. तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही आम्हाला गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत एवढे लक्षात असू दे. ही धमकी समजा नाहीतर खुलं आव्हान… आता होऊनच जाऊ दे, असे सांगत अमेय खोपकर यांनी इशारा दिला आहे.
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही राऊतांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. आम्ही फुसकी लवंगी आहोत, इलेक्ट्रिक माळ की ॲटमबॉम्ब आहोत, हे ४ जूनला ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे त्यांना कळेल. पण एक नक्की, यांचा फुगा फाटला आहे, रोज उद्धव ठाकरे त्यांच्यामध्ये हवा भरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या फाटलेल्या फुग्याने आमच्याबद्दल बोलायची गरज नाही. त्यांनी स्वत:चे बघावे आणि शरद पवारांकडून त्यांच्या फुग्याला ठिगळे लावून घ्यावीत, असा पलटवार संदीप देशपांडे यांनी केला.