हत्तीला वाटायचं आपलीच आरती होतेय, पण...; मोरेंच्या राजीनाम्यानंतर अविनाश जाधवांची खोचक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 10:06 PM2024-03-12T22:06:05+5:302024-03-12T22:07:34+5:30

अविनाश जाधव यांनी या पोस्टच्या माध्यमातून तिरकसपणे वसंत मोरे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

mns leader Avinash Jadhav fb post viral after pune vasant More resignation | हत्तीला वाटायचं आपलीच आरती होतेय, पण...; मोरेंच्या राजीनाम्यानंतर अविनाश जाधवांची खोचक पोस्ट

हत्तीला वाटायचं आपलीच आरती होतेय, पण...; मोरेंच्या राजीनाम्यानंतर अविनाश जाधवांची खोचक पोस्ट

MNS Vasant More ( Marathi News ) :मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षांतर्गत राजकारणाचा त्रास असह्य झाल्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. मोरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक खोचक पोस्ट शेअर केली असून नाव न घेता त्यांनी वसंत मोरे यांना टोला लगावल्याचं बोललं जात आहे.

अविनाश जाधव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा. तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं,आरती ओवाळली जायची,धुमधड्याक्यात स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं औक्षण-आरती, आपलीच केली जात आहे. त्याला कळत नव्हतं ही राजाची पुण्याई आहे. राजामुळे त्याला हा मान मिळत आहे." अविनाश जाधव यांनी या पोस्टच्या माध्यमातून तिरकसपणे वसंत मोरे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राजीनामा देताना काय म्हणाले वसंत मोरे?

मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे नाराज होते. "मला तिकीट मिळू नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. यापुढे मी काय करायचे हे पुणेकर ठरवतील. जर लोकसभा लढवायची ठरवली तर मी एकटा लढणार, माझ्या घरातील मी पहिला राजकारणी, कुणाच्या कुबड्या घेऊन पुढे आलो नाही. राजसाहेबांच्या हृदयात मी स्थान निर्माण केले, पण ते डळमळीत करण्याचं काम पुणे कोअर कमिटी करतेय," असा आरोप वसंत मोरे यांनी राजीनामा देताना केला आहे.

वसंत मोरे म्हणाले की, "२०१७ पर्यंत मनसे हा पुणे शहरातील दुसऱ्या नंबरचा पक्ष होता. मग आता लोकसभा निवडणुकीत कोअर कमिटीने जाणुनबुजून नकारात्मक अहवाल दिला. मी माझे परतीचे दोर कापलेत. मी कुठल्याही परिस्थितीत आता मनसेत राहणार नाही. मी या लोकांसोबत काम करणार नाही. येत्या २-३ दिवसांत मी लोकसभेच्या निवडणुकबाबतीत पुणेकरांशी बोलून चर्चा घेईन. मला पुणेकर जी भूमिका सांगतील त्यावर निर्णय घेईन," असं मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.


 

Web Title: mns leader Avinash Jadhav fb post viral after pune vasant More resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.