Maharashtra Politics: “महा-बोगस आघाडी, भाड्याने लोकं आणलीच होती तर त्यांना किमान समजावून आणायचं ना!!”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 05:31 PM2022-12-17T17:31:02+5:302022-12-17T17:32:17+5:30
Maharashtra News: महामोर्चासाठी आलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कशासाठी आलोय, तेच माहिती नव्हते, यावरून मनसेने महाविकास आघाडीवर टीका केली.
Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांनी केलेली अपमानास्पद विधाने, सीमावादप्रश्न यांसह अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात तीनही पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक आघाडीचे नेते मोर्चात होते. या मोर्चावर भाजपसह मनसेनेही टीका केली आहे. या मोर्चात आलेल्या कार्यकर्त्यांना कशासाठी आलो आहोत, हेही माहिती नसल्याचे समोर आले. यावरून आता मनसेने महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला.
महाविकास आघाडीचा शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करणारा हल्लाबोल मोर्चा, तर दुसरीकडे या महामोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून माफी मांगो आंदोलन करण्यात आले. राज्यातील अनेक भागातून या महामोर्चात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते आले होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोर्चाला महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या महिलांशी लोकमतच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी या महिलांनी आपल्याला मोर्चा कसला आहे ते माहिती नाही असे सांगितले. राजूभाई आम्हाला इथे घेऊन आला आहे, असे या महिलांनी सांगितले. या महिलांच्या हाती मोर्चाचे बॅनर होते, त्यावर विचारले असता काहींनी आपण अंगठछाप असल्याचे सांगितले. यावरून मनसे नेते गजानन काळे यांनी महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे.
भाड्याने लोकं आणलीच होती तर त्यांना किमान समजावून आणायचं ना!!
गजानन काळे यांनी ट्विट केले आहे. यामध्ये, भाड्याने लोकं आणलीच होती तर त्यांना किमान समजावून आणायचं ना !! म्हणूनच तुम्ही- " महा-बोगस आघाडी ", असे खोचक ट्विट केले आहे. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या महामोर्चावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होतो आहे, तसा हा नॅनो मोर्चा होता, असे सांगून फडणवीस म्हणाले की, कोणत्या तोंडाने हे मोर्चा काढत आहेत. महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान कुणीच करू नये आणि कुणी करीत असेल तर ते योग्य नाही, अशीच स्पष्ट भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे. त्यामुळे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो आहे. मुद्दे संपले की अशा कारणांवर मोर्चे काढले जातात, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दरम्यान, संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान करत काढलेला मोर्चा हा आक्रोश मोर्चा नसून सत्तेची खुर्ची गेल्यानंतर होणारा थयथयाट आहे, त्यामुळे हा थयथयाट मोर्चा असल्याची टीका भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"