Maharashtra Karnataka Border Dispute: “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना...”; मनसेचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 03:56 PM2022-12-09T15:56:41+5:302022-12-09T15:58:23+5:30
Maharashtra Karnataka Border Dispute: खरंच यांना धमकी आली का पाहावे, अशी शंका मनसेकडून उपस्थित करण्यात आली आहे.
Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न दिवसेंदिवस शिगेला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून लोकसभेतही खडाजंगी झाली. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही दिले आहे. यातच यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कन्नड रक्षण वेदिकेकडून धमकीचे फोन आल्याचा दावा केला आहे. यावरून मनसेने पुन्हा एकदा खोचक टोला लगावला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून वारंवार परखड भूमिका मांडत असल्याने कन्नड रक्षण वेदिकेकडून धमकीचे फोन आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. बेळगाव सीमावासियांवर अन्याय होताना शिंदे सरकार काहीच ठोस भूमिका घेत नाही. हे सरकार षंढ, नामर्द असून, कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केले. माझ्यावर हल्ला झाला तर तो माझ्यावर नसून महाराष्ट्रावर झालेला हल्ला असेल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. यानंतर आता मनसेने नेते गजानन काळे यांनी यावर एक वेगळी शंका उपस्थित करताना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
खरंच यांना धमकी आली का पहावे सरकारने
मनसे नेते गजानन काळे यांनी एक ट्विट केले आहे. सौ दाऊद ज्यांना घाबरतात त्यांना धमकी आल्याच कळतंय..काळजी नका करू सरकार संरक्षण देईलच पण जर शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना महाराष्ट्रसैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील. मात्र चर्चेत राहण्यासाठी अश्या काड्या पिकवू नका. खरंच यांना धमकी आली का पहावे सरकारने, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सौ दाऊद ज्यांना घाबरतात त्यांना धमकी आल्याच कळतंय..काळजी नका करू सरकार संरक्षण देईलच पण जर शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना महाराष्ट्रसैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील.
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) December 9, 2022
मात्र चर्चेत राहण्यासाठी अश्या काड्या पिकवू नका.
खरंच यांना धमकी आली का पहावे सरकारने.
दरम्यान, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, धमकी कुणाला येत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. लोकप्रतिनिधीला थेट करत असेल तर त्याची चौकशी अधिक गांभीर्याने घेतली पाहिजे. राऊत यांच्या वक्तव्यामागे नेहमी काही ना काही अजेंडा असतो. यावेळीही असेल. त्यामुळे या फोन कॉलची खरोखरच चौकशी झाली पाहिजे, असे नवनीत राणा म्हणाल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"