“म्हणे हाताला काम... हे राम..,” आजींचा फोटो शेअर करत मनसेचा शिवसेनेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:25 AM2022-05-13T10:25:59+5:302022-05-13T10:27:47+5:30
१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. यापूर्वी शिवसेनेनं एक पोस्टर जारी केला होता.
१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. “आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत,” असं उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. दरम्यान, यानंतर शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी एक टीझर जारी केला होता. तसंच त्यानंतर शिवसेनेनं एक पोस्टरही ट्विटरवरून जारी केला होता.
‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व,’ असल्याचं शिवसेनेनं त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला होता. तसंच यावर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. तसंच ही सभा कुठे आणि किती वाजता आयोजित करण्यात आली असून ‘यायलाच पाहिजे’ असंही त्यावर नमूद करण्यात आलंय. आता यावरून मनसेचे नेते आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
म्हणे हाताला काम...
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 13, 2022
हे राम...! pic.twitter.com/C6kj9ZoH5A
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आजींची भेट घेतली होती. मनसेनं शिवसेनेच्या पोस्टरसह आजींचा फोटो लावला आहे. तसंच त्यात ‘हाता काम…? माझ्या नातवाला तरी आधी नोकरी द्या…’ असं म्हणत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच काळे यांनी या फोटोला “म्हणे हाताला काम.. हे राम,” असं कॅप्शनही दिलंय.