"परप्रांतीयांची स्तुती कसली करता?; तुम्ही महाराष्ट्राचे खासदार आहात"; मनसेनं अरविंद सावंतांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:23 PM2020-06-15T16:23:28+5:302020-06-15T16:29:53+5:30
अरविंद सावंत यांच्या या भूमिकेवर मनसेनं टीकास्त्र सोडलं असून, काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुंबईः लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले आहेत. सोशल मीडियावर अरविंद सावंतांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लागलीच मनसेनं शिवसेनेवर बाण सोडले आहेत. दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या एका व्हिडीओमध्ये ते परप्रांतीय मजुरांचे कौतुक करताना दिसत आहेत. अरविंद सावंत यांच्या या भूमिकेवर मनसेनं टीकास्त्र सोडलं असून, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मनसेचे सरचिटणीस आणि नेते नितीन सरदेसाई यांनी अरविंद सावंत यांना कोंडीत पकडलं आहे. परप्रांतीय मजुरांची स्तुती करून तुम्ही राज्यातील तरुणांच्या काम करण्याच्या क्षमतेवर सवाल उपस्थित केला आहे. तुम्ही परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रात येण्यास सांगत आहात, पण तुम्हीसुद्धा महाराष्ट्राचे मुंबईचे खासदार आहात हे विसरू नका, असा दमच मनसेनं भरला आहे.
“तुम्ही महाराष्ट्रातील तरुणांची हेटाळणी करताय आणि परप्रांतीयांचे गोडवे गाताय. आपल्या मुलाला ‘कार्टा’ आणि दुसऱ्याच्या मुलाला ‘बाब्या’ बोलणं बंद करा”, असे सरदेसाई म्हणाले आहेत. “अरविंदजी तुम्ही महाराष्ट्रातल्या मुंबईचे खासदार आहात. दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला तिकडे पाठवलं आहे. यापुढे परप्रांतीयांचे गोडवे गाणं बंद करा आणि महाराष्ट्रातील मुलं व्यवसायात कशी पुढे जातील यासाठी प्रयत्न करा,” असा सल्ला नितीन सरदेसाई यांनी दिला आहे.
आपण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या संधीचा विचार केला पाहिजे. तो न करता परप्रांतीय किती चांगलं काम करतात याची स्तुती कशी काय करता?, असा सवालही नितीन सरदेसाईंनी विचारला आहे. कोरोनाच्या संकटामुळे परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात निघून गेले आहेत. त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. पण तुम्ही त्यांची अवहेलना करताय, हे चुकीचं असल्याचंही सरदेसाई यांनी अधोरेखित केलं आहे.
हेही वाचा
आता चीनचं 'टेन्शन' वाढणार, भारताची ताकद पहिल्यांदाच रशियात दिसणार!
भारत-नेपाळमध्ये रोटी-बेटीचं नातं, जगातील कोणतीही ताकद ते तोडू शकत नाही- राजनाथ सिंह
आठ वर्षे विम्याचे हप्ते भरल्यास विमा कंपनीला द्यावा लागणार क्लेम, Irdaiचे आदेश
पोस्टाच्या सहा जबरदस्त योजना; लॉकडाऊनच्या काळात गुंतवणूक करा अन् मिळवा मोठा लाभ